मुंबईत पुढील 48 तासात बरसणार सरीवर सरी; मराठवाड्यासह कोकणला यलो अलर्ट

अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या मॉन्सूनने राज्यात प्रवेश केला आहे. वेळेआधीच मॉन्सून आल्याने बळाराजासह उष्णतेने त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. आता प्रवेश केलेल्या मॉन्सूनने मुसळधार बरण्याची तयारी केली आहे. राज्यात पुढील 48 तासास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, कोकण आणि मराठवड्यात शनिवार, रविवारी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 48 तासात मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाची रिमझिम सरी बरसल्या आहेत. उन्हाच्या काहिलीने आणि घामांच्या धारांनी त्रासलेल्या नागरिकांचे डोळे मान्सूनकडे लागले आहेत. सध्या राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असून मान्सून लवकरच पूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.

ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि अहमदनगर या भागात काही ठिकाणी रिमझिम सरी पडण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातील जनता उष्णतेच्या झळांनी त्रस्त आहे. दुसरीकडे केरळ, तामिळनाडूमध्ये जोरदार मान्सूनची हजेरी पाहायला मिळत आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू देश व्यापणार आहे. सध्या अनेक भागात उष्णतेची लाट असली तरी, देशात हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एल निनो संपून आता ला निनो सुरु होणार आहे. यामुळे यंदा जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत मॉन्सून सर्व देश व्यापणार आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.