महाराष्ट्राला सलग सहावा दुहेरी मुकुट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी क्रीडांगणात धडाकेबाज खेळ करीत राष्ट्रीय खो-खो स्पर्धा गाजवली. महाराष्ट्राच्या कुमार संघाने कोल्हापूरला, तर मुलींच्या संघाने कर्नाटकला पराभूत करीत सलग सहाव्यांदा अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. कुमारांचे हे सलग पंधरावे जेतेपद ठरले. तसेच महाराष्ट्राच्या कुमारांनी 31व्यांदा ही स्पर्धा जिंकली असून महाराष्ट्राच्या मुलींनी 22व्यांदा या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे.

कुमारांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरवर 13-12 असा साडेतीन मिनिटे राखून एक गुणाने दणदणीत विजय साजरा केला. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रने कर्नाटकचा 9-7 असा 1 मिनिट 40 सेकंद राखून दोन गुणांनी दणदणीत पराभव केला व जेतेपदावर हक्क सांगितला. कुमार गटातील स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजेच ‘वीर अभिमन्यू’ पुरस्कार महाराष्ट्रातील नाशिकच्या दिलीप खांडवी याने मिळवला, तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संरक्षकाचा पुरस्कार महाराष्ट्राच्या सौरभ आहिर व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमकाचा पुरस्कार कोल्हापूरच्या रोहन शिंगाडेने मिळवला. मुलींच्या गटातीत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजेच ‘जानकी पुरस्कार’ महाराष्ट्रातील धाराशीवच्या जानवी पेठेने मिळवला. तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संरक्षकाचा पुरस्कार महाराष्ट्राच्या रेश्मा राठोडने व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमकाचा पुरस्कार कर्नाटकच्या वरलक्ष्मीने मिळवला.