विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून

595

येत्या सोमवार, 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होणार आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयके, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे. विधान परिषदेत सात अशासकीय विधेयकांवर चर्चा होईल.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली. विधानसभा सल्लागार समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, आमदार चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशीष शेलार, अमिन पटेल, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजय वड्डेटीवार, सुनील प्रभू आदी उपस्थित होते, तर विधान परिषद कामकाज सल्लागार समिती बैठकीस उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, आमदार भाई गिरकर, हेमंत टकले, डॉ. रणजित पाटील, शरद रणपिसे, सुरजितसिंह ठाकूर, भाई जगताप, अनिल परब, जयंत पाटील, रामहरी रुपनवर आदी उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे- पाटील, आशीष शेलार, विजय वडेट्टीवार यांच्यासह विधान मंडळ सदस्य व विधान मंडळ अधिकारी उपस्थित होते.

शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा ठराव

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील शरद बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या