
काझीपेठ येथील रेल्वे ग्राऊंडवर रंगलेली 58 वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत थरारक ठरली. हिंदुस्थानी खो-खो महासंघाच्या मान्यतेने व तेलंगणा खो-खो संघटनेच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या महास्पर्धेत महाराष्ट्राने महिलांच्या गटात अजिंक्यपदाचा झेंडा फडकावला, तर रेल्वेच्या शिलेदारांनी पुरुष गटात आपले वर्चस्व सिद्ध केले. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाला हरवले, तर पुरुषांच्या अंतिम लढतीत रेल्वेने महाराष्ट्रावर रोमहर्षक विजय मिळवला. या स्पर्धेत धाराशीव, महाराष्ट्राच्या संध्या सुरवसेला ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’, तर रेल्वेच्या रामजी कश्यपला (सोलापूर) ‘एकलव्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. महिलांमध्ये महाराष्ट्राचे 27 वे, तर पुरुषांमध्ये रेल्वेचे 13 वे अजिंक्यपद ठरले.
महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर 23-22 असा 1 गुणाने थरारक विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात प्रियंका इंगळे, संध्या मोरे, संध्या सुरवसे आणि अश्विनी शिंदे यांनी निर्णायक योगदान दिले. पराभूत ओडिशाकडून अर्चना प्रधान, अर्चना माझी, मधुस्मिता ओझा आणि शोभाश्री सिंग (1.50 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी जबरदस्त लढत दिली; मात्र त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेल्वेने महाराष्ट्राचा 26-21 असा 5 गुणांनी पराभव करत जेतेपद पटकावले. मध्यंतराला रेल्वे संघ 14-11 ने आघाडीवर होता. विजयी रेल्वे संघाकडून रामजी कश्यप (नाबाद 2.30 मि. संरक्षण व 2 गुण), महेश शिंदे (1.40 मि. झुंज), जगन्नाथ दास (1.40 मि. संरक्षण व 4 गुण), अरुण गुणकी (1.37 मि. संरक्षण व 2 गुण) आणि अभिनंदन पाटील (4 गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राकडून प्रतीक वाईकर (1.55 मि. संरक्षण व 2 गुण), अनिकेत चेंदवणकर (1.30 मि. संरक्षण व 6 गुण) आणि शुभम उतेकर (नाबाद 1 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी झुंजार खेळ केला.




























































