राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे निलंबित

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर समांतर कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत संघटनेच्या घटनेचे उल्लंघन, आज्ञाभंग आणि बेकायदेशीर कृतीसाठी परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही कारवाई करत लांडगे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

बाळासाहेब लांडगे यांच्यावरील कारवाईमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पवार यांनी याबाबत लांडगे यांना दिलेल्या पत्रामध्ये 25 जून रोजी परिषदेने जाहीर केलेल्या कार्यकारी समितीच्या निवडणुका, तसेच 26 आणि 27 जुलै रोजी मतदान होईल अशा सूचना केल्याचे म्हटले आहे.

उपाध्यक्ष यांना निवडणूक अधिकारी म्हणून निवडणुकीचे पर्यवेक्षण, तर देखरेख करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना विनंती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार माजी न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी जबाबदारी स्वीकारत वेळापत्रक जारी केले. मात्र, तरीही लांडगे यांनी 27 जून 2025 रोजी एक पत्र जारी करून 16 जुलै रोजी समांतर निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. याला चुकीचे, दुर्भावनापूर्ण आणि सचिव म्हणून कर्तव्यांचे उल्लंघन ठरवून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच दिवसांत कारणे स्पष्ट करून उत्तर देण्याचे निर्देश पवार यांनी पत्राद्वारे दिले आहेत.