
रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. आज अर्ज माघारीनंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी व पंचायत समित्यांच्या ११८ गणांसाठी एकूण ५०२ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत जिल्हा परिषदेच्या १९२ तर पंचायत समितीच्या ३२७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७३ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. तिरंगी लढतीमुळे सर्वच ठिकाणी चुरशीने आणि अटीतटीने निवडणूक होत आहे.
रायगड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, भाजप, अजित पवार गट, शिंदे गटासह अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर तालुक्यातील निवडणुकीसाठी १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. मुदतीत जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी ३६८ तर पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी ६७८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जाची छाननी २२ जानेवारी रोजी झाली. छाननीत जिल्हा परिषदेचे ७ तर पंचायत समितीचे २२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत जिल्हा परिषदेच्या १९२ तर पंचायत समितीच्या ३२७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
- रायगड जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा कार्यकाळ २२ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला.
- २०२२ पासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकीय राजवट.
- ७ फेब्रुवारीनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार.
१७ लाख मतदार
रायगड जिल्ह्यात १७ लाख ३८१ मतदार आहेत. यामध्ये ८ लाख ५७ हजार ९ महिला आणि ८ लाख ४६ हजार ३४७पुरुष तसेच २५ तृतीयपंथी मतदार जिल्हा परिषदेच्या ५९ गट तर १५ पंचायत समित्यांच्या ११८ गणांमध्ये मतदान करणार आहेत. जिल्ह्यातील २ हजार ३२३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

























































