
सामना प्रतिनिधी । जालना
अनेक दिवसांपासून भोकरदन तालुक्यातील पारध येथील महावितरणचे ट्रान्सफार्मर जळाले असून अनेक वेळा विनंत्या करुनही महावितरण जळालेले ट्रान्सफार्मर बदलून देत नव्हते. पारधच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांसमोर महावितरण नरमले आणि पारधचे पाचही ट्रान्सफार्मर बदलून दिले आहे.
भोकरदन तालुक्यातील पारध येथील ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असून तेथील गावठाण परिसरातील पाच ट्रान्सफार्मर जळाले होते. जळालेले ट्रान्सफार्मर बदलून मिळावे म्हणून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या. मात्र महावितरणचे अधिकारी दाद देत नव्हते. यामुळे पारध गाव अंधारात होते. गावातील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजना बंद झाली होती. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महावितरणच्या अधिक्षक अभियंता यांना गावातील ट्रान्सफार्मर बदलून देण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. मात्र बघू, पाहू, अशी उत्तरे मिळाली. त्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत जालना शहरातील कन्हैयानगर परिसरातील विदर्भ मराठवाड्याला जोडणारा चिखली-जालना मार्गावर जबरदस्त रास्ता रोको केला. जोपर्यंत ट्रान्सफार्मर बदलून मिळणार नाही. तोपर्यंत वाहतूक बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला. शिवसैनिकांच्या आक्रमक भुमिकेमुळे महावितरणचे अधिकारी नरमले आणि पारध येथील पाचही ट्रान्सफार्मर बदलण्यात आले.































































