
संगमेश्वर येथील मुख्य आठवडा बाजारपेठेतील महावितरणचा एक विद्युत खांब सध्या पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. या खांबावरील उघड्या विद्युत तारांमुळे दररोज ४ ते ५ पक्ष्यांचा शॉक लागून मृत्यू होत असून, यामध्ये कावळ्यांची संख्या सर्वाधिक आहे. महावितरणच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
संगमेश्वर बाजारपेठ हा परिसरातील महत्त्वाचा व्यापारी केंद्र आहे. या ठिकाणी असलेल्या आठवडा बाजार परिसरातून महावितरणची उच्च दाबाची विद्युत वाहिनी जाते. या वाहिनीचा एक विशिष्ट पोल हा पक्ष्यांच्या विसाव्याचे ठिकाण बनला आहे. मात्र, याच पोलवर असलेल्या तारांचे इन्सुलेशन खराब झाल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे या ठिकाणी बसणाऱ्या पक्ष्यांना जोरदार विद्युत झटका बसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून ही मालिका सुरूच असून दररोज जमिनीवर पक्ष्यांचे मृतदेह पडलेले पाहायला मिळत आहेत.
या गंभीर विषयावर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने महावितरणकडे वारंवार दाद मागितली आहे. मात्र, वीज वितरण कंपनीकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. निसर्गाच्या अन्नसाखळीत कावळ्यांसारख्या पक्ष्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ते पर्यावरणातील साफसफाईचे काम करतात. मात्र, संगमेश्वर बाजारपेठेत होत असलेल्या या मृत्यू सत्रामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जर या खांबावर ‘गार्डिंग’ किंवा तारांचे प्लास्टिक कोटिंग केले असते, तर हे मृत्यू रोखता आले असते.
येत्या काळात पावसाळा जवळ येत आहे, अशा परिस्थितीत हे उघडे विद्युत खांब अधिक धोकादायक ठरू शकतात. महावितरणने केवळ कागदी घोडे न नाचवता तातडीने या खांबाची दुरुस्ती करावी, अशी मागणी संगमेश्वरवासीयांकडून केली जात आहे. जर यावर त्वरित उपाययोजना झाली नाही, तर पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थ महावितरणच्या कार्यालयावर धडक देण्याच्या तयारीत आहेत.
आम्ही महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना या विद्युत खांबाच्या धोक्याबाबत वारंवार कल्पना दिली आहे. पक्षी मरत आहेत, उद्या एखादी मोठी दुर्घटना घडून मानवी हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र, महावितरणचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
– प्रदीप शिंदे, सरपंच असुर्डे
एकाच दिवशी 9 मृत्यू
बाजारपेठेतील परिस्थिती किती गंभीर आहे, याचा प्रत्यय नुकताच आला. दिवसभरात तब्बल ९ कावळे या खांबावर शॉक लागून मृत्यूमुखी पडले. आधीच निसर्गचक्रातून कावळ्यांची संख्या कमी होत असताना, अशा प्रकारे मानवनिर्मित चुकांमुळे त्यांचा बळी जाणे ही चिंतेची बाब आहे. या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
संगमेश्वरमधील ही घटना ‘पक्ष्यांचा वीजप्रवाहामुळे मृत्यू’ (एव्हियन इलेक्ट्रोक्युशन) चे स्पष्ट उदाहरण आहे, जिथे उघड्या विद्युत तारांमुळे पक्ष्यांचा तत्काळ मृत्यू होतो. कावळ्यांसारख्या निसर्गातील सफाई कामगार (स्कॅव्हेंजर) पक्ष्यांवर याचा विशेष परिणाम होत आहे.यावर उपाय म्हणून तारांचे योग्य वीजरोधक आवरण (इन्सुलेशन), ‘पक्षी मार्गदर्शक’ (बर्ड डायव्हर्टर्स) बसवणे आणि सुरक्षित रचनेची (डिझाइनची) अंमलबजावणी तातडीने आवश्यक आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास हा धोका जैवविविधतेसोबत मानवी सुरक्षेलाही गंभीर ठरू शकतो.
– प्रतीक मोरे, पर्यावरण अभ्यासक
































































