एकच संकल्प… भगवे सरकार!! महायुतीची अति अतिविराट सभा!

एक काळ असा होता जेव्हा सतत दहशतवादी हल्ले होत असत. या बॉम्बस्फोटाच्या धमाक्यांनी मुंबई हादरत होती. हे हल्ले होताना काँगेसने काय केले? बळी पडलेल्या मुंबईकरांच्या नातेवाईकांना त्यांनी न्याय दिला नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँगेस आघाडीवर जोरदार टीका केली. केंद्रात आमचे सरकार आल्यावर या दहशतवाद्यांनी डोके वर काढण्याची हिंमत केली नाही आणि करणारही नाहीत. लक्षात ठेवा, गलती कि तो उसकी पुरी सजा मिलेगी असा सज्जड इशाराच मोदींनी दहशतवाद्यांना आणि त्यांना साथ देणाऱ्यांना दिला.

वांद्रे येथील बीकेसी मैदानावर शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची महासभा सायंकाळी अतिविराट गर्दीत पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना मोदींनी काँगेस आघाडीच्या नाकर्तेपणावर टीकास्त्र सोडले. मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले तेव्हा काँग्रेसवाले कोणाच्या सोबत उभे होते, दहशतवादी हल्ले सीमेपलीकडे बसलेल्या मास्टर माइंडकडून करण्यात आले पण काँग्रेसवाल्या लोकांनी ते हल्ले सीमेपलीकडील दहशतवाद्यांनी नव्हे तर घरातल्यानीच केले असे भासवले. पण आता परिस्थिती बदलली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. कधी मिर्चीचा व्यापार, कधी मिर्चीशी व्यवहार करणाऱ्यांना या देशाची पर्वा नाही, असा घणाघात मोदी यांनी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांवर केला.

बँकिंग व्यवस्था खिळखिळी करणारे जेलमध्ये गेले आहेत. हे स्वच्छता अभियान सुरूच राहील. एकही भ्रष्टाचारी वाचणार नाही. त्यांना शिक्षा होईलच. कारण एखादा संकल्प पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबत नाही. संकल्प पूर्ण करताना थकत नाही आणि कोणाच्या समोर वाकत नाही असा इशारा मोदी यांनी यावेळी दिला.

मुंबईकरांची सेवा आमचे कर्तव्य
आमची नाळ मुंबईशी जुळलेली आहे. भाजपचा जन्मच मुळी मुंबईत झालाय. त्यामुळे मुंबईशी आमचे गर्भ आणि नाळेसारखे जन्माचे नाते आहे म्हणूनच मुंबईकरांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. राजकारण आमच्यासाठी राष्ट्रसेवेचे माध्यम आहे. आम्ही तर भाजपवाले आहोत.

शिवस्मारकाचे काम लवकरच सुरू
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या मुद्दय़ावरून टीका केली जाते. शिवस्मारकाचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या शिवस्मारकाच्या कामाला गती देण्याचे काम आमच्या सरकारने केले. न्यायालयाचा हिरवा कंदील मिळताच स्मारकाच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास मोदींनी दिला. यावेळी शिवसंग्रामचे विनायक मेटे, रिपाइंचे रामदास आठवले यांचीही भाषणे झाली.

भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही
महाराष्ट्राने भ्रष्ट सरकारच्या कार्यकाळानंतर भरवशाचे सरकार पाहिले आहे. आधीच्या सरकारने वीर सैनिकांच्या कुटुंबालाही सोडले नाही. त्यांच्यासमोर भ्रष्टाचाराचा ‘आदर्श’ उभा करून त्यांना धोका दिला. आधीच्या सरकारने फक्त योजनांमधून पैसे काढले. केवळ लोकांमध्ये भ्रम निर्माण केला. पण महायुतीचे सरकार योजनांना गती देत आहे. याआधीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या सिंचन योजनांच्या माध्यमातून केवळ भ्रष्टाचाराचे सिंचन केले. मात्र आज आमचे भरवशाचे सरकार लोकांच्या हितासाठी काम करीत असून मागील पाच वर्षांत आमच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही. आता भ्रष्टाचार कमी होत आहे. हाच संस्काराचा फरक आहे आधीच्या सरकारमध्ये आणि आजच्या सरकारमध्ये, असे नरेंद्र मोदी यांनी ठणकावले.

काँग्रेसच्या काळात फक्त खुर्चीचा खेळ
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात फक्त खुर्चीचा खेळ सुरू असायचा. एक मुख्यमंत्री झाला की दुसरा मुख्यमंत्री कोण, मंत्री कुणाला करायचे याचीच चर्चा पाच वर्षे सुरू असायची. मी येतो, तू जा असे करण्यातच यांच्या सरकारचा कार्यकाळ संपायचा. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही राज्यात पूर्ण पाच वर्षे सरकार दिले. त्यामुळेच मुंबई व राज्यात विकासकामे करण्यात सरकारला यश आल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी अनुकंपा तत्त्वावर मते मागतेय-मुख्यमंत्री
काही लोक नखे कापून शहीद झाल्याचा आव आणत आहेत. ईडीला आम्ही घाबरत नाही, ईडीची आम्हाला गरज नाही असे म्हणत आहेत. पण महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीतच पक्के झाले होते की महाराष्ट्रात विधानसभेतही महायुतीचे सरकार येणार. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसारखी राष्ट्रवादी काँग्रेस अनुकंपा तत्त्वावर मते मागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका केली.

वयाने लहान असलो तरी आखाडय़ातील वस्ताद आहोत
आम्ही लहान मुलांशी लढत नाही असे शरद पवार मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, खरंय. आम्ही लहानच आहोत. पण गेल्या पाच वर्षांत तुम्ही पदोपदी आमच्याशी लढलात आणि प्रत्येक निवडणुकीत चारीमुंडय़ा चीत झालात. आता तुमच्या लक्षात आले की, आम्ही दिसायला आणि वयाने लहान असलो तरी या आखाडय़ातील वस्ताद आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेना-भाजपा महायुतीच्या काळातच मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास झाला असे ठाम प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात जे प्रकल्प केले नाहीत ते महायुतीने गेल्या पाच वर्षांत मार्गी लावले असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी मेट्रो रेल्वे, ट्रान्स-हार्बर लिंक, कोस्टल रोड, धारावी पुनर्वसन या प्रकल्पांचा दाखला यावेळी दिला. यातला एकही प्रकल्प आघाडी सरकार करू शकली नाही ते प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने केले असे ते म्हणाले. मुंबईचा चेहरा आता बदलत असून येत्या दोन-तीन वर्षांत हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई हे एक सर्वोत्तम महानगर असेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या