
राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे महायुती सरकारने आदिवासींच्या निधीवर पुन्हा एकदा डल्ला मारला आहे. लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळविण्यात आला आहे. हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने दर महिना 1 हजार 500 रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. सरकारने निवडणुकीपूर्वी योजनेतील लाभार्थी महिलांना पाच महिन्यांचे हप्ते दिले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत आलेल्या महायुती सरकारला तिजोरीत पैसे नसल्याने लाडक्या बहिणींना नियमितपणे हप्ते देणे अवघड बनले आहे. त्यातून एप्रिल महिन्यातसुद्धा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता.