लाडक्या बहिणी, ज्येष्ठांना सवलती दिल्या, पण परताव्याची बोंब; सरकारने एसटी महामंडळाचे 942 कोटी रुपये थकवले!

सरकारने एसटीच्या प्रवासात लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात सूट दिली. मतदारांना खूश करण्यासाठी अशा सवलतींची घोषणा करणाऱया महायुती सरकारने एसटी महामंडळाला सवलत मूल्याची प्रतिपूर्ती करताना आखडता हात घेतला आहे. दर महिन्याला मागणीच्या तुलनेत कमी रक्कम देत सरकारे महामंडळाचे 942 कोटी 72 लाख रुपये थकवले आहेत.

एप्रिल 2025 अखेर सवलत मूल्यापोटी 912.54 कोटींचा निधी वितरित करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यापैकी 374.09 कोटी रुपये प्राप्त झाले असून 538.45 कोटी रुपयांची कमी रक्कम वितरित झाली आहे. त्यात मे महिन्याच्या 404.26 कोटी रुपयांच्या सवलत मूल्याची भर पडल्याने थकीत सवलत मूल्याचा आकडा 942.72 कोटी रुपयांवर गेला आहे.

कर्मचाऱयांचे प्रश्न प्रलंबित

2016 पासून प्रलंबित 1 टक्के वार्षिक वेतनवाढ, घरभाडे भत्त्याचा फरक, 2018 पासून महागाई भत्त्याचा फरक, एप्रिल 2020 ते मार्च 2024 पर्यंतचा 6500 रुपये वेतनवाढीचा फरक असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.