
महानगरपालिका निवडणुका राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने महायुती करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस राहिले तरी कोण कुठे लढणार याबाबत काहीच स्पष्टता नसल्याने इच्छुकांची चलबिचल वाढली आहे. मुंबई, ठाण्यात दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असला तरी काही जागांवरून पेच अद्याप कायम आहे. पुण्यात भाजपविरोधात शिंदे गटात खदखद उफाळून आली आहे. नाशिकमध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये झालेल्या प्रवेशावरून सुरू झालेल्या नाराजीनाटय़ामुळे जागावाटपात तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे महायुतीची घोषणा लांबणीवर पडली आहे.
महायुतीच्या घोषणेबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आमची महायुती आधीच आहे. त्यामुळे आम्हाला घोषणेची गरज नाही. भाजप आणि शिंदे गट एकत्र आहोत. सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीची घोषणा कधी होते याकडे राज्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
27 जागांवर तिढा
मुंबईत भाजप 140 तर शिंदे गट 87 जागा लढेल असा तोडगा काढण्यात आला आहे. मॅरेथॉन बैठकांमधून जवळपास 200 जागांवर दोन्ही पक्षांत एकमत झाले आहे. 27 जागांवर तिढा असून त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि आता शिंदे गटात नसलेल्या जागांवर भाजपने दावा केल्याने तिढा निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
घडय़ाळ की तुतारी… दोन्ही राष्ट्रवादीची बोलणी फिस्कटली
पुण्यात जागावाटपाचा तिढा आणि घडय़ाळ की तुतारी चिन्हावर लढायचं, यावरून मतभेद झाल्याने दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली आहे. अजित पवार गटाने 35 जागा आणि घडय़ाळ चिन्हावर लढण्याची अट घातली होती. मात्र ही अट शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अमान्य केली असून आता पुढे काय, असा प्रश्न दोन्ही पक्षांपुढे आहे.
कल्याण-डोंबिवलीत भाजप ठाम
कल्याण-डोंबिवलीत 122 पैकी 83 हून अधिक जागा सोडण्याची तयारी आणि पाच वर्षे भाजपकडेच महापौरपद सोडण्याची हमी शिंदे गटाने दिली तरच युती शक्य आहे. अन्यथा, आमचा मार्ग मोकळा आहे, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.
ठाण्यात भाजपची नाराजी कायम
ठाण्यात जागावाटपात भाजपने 55 जागांची मागणी केली होती, पण शिंदे गटाने स्वतः 81 तर भाजपला 45 जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत जागावाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मात्र भाजपच्या वाटय़ाला येणाऱया जागांवरून स्थानिक नेत्यांत नाराजी आहे.
नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर नाराजांचे आंदोलन, कमर्शियल पद्धतीने तिकीट वाटप सुरू असल्याचा आरोप
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी शिंदे गट कमर्शियल केला असून कमर्शिअल पद्धतीने तिकीट वाटप केले जात असल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी डॉ. गोऱहे यांच्या घराबाहेर आंदोलन करून जाब विचारला.




























































