कवडसे – योगायोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

कधी कधी आयुष्याच्या वाटेवर चालताना कुठल्यातरी एका अनोळखी वळणावर एखादा अनोळखी चेहरा समोर येतो.  सुरुवातीला ओळख पटत नाही. मग तो चेहराच काही जुन्या आठवणखुणा लक्षात आणून देतो. मग ओळख पटते. काही जुने शब्द आठवतात. आमच्यात झालेले काही संवाद आठवतात. मन पुन्हा गतकाळात फिरून येतं. तोवर त्या चेहऱ्याची ओळख चांगलीच पटलेली असते आणि पुन्हा एक नवा संवाद सुरू होतो.

मागच्या भेटीत कुठल्या वळणावर आणि कुठल्या विषयावर आमच्यातला संवाद खुंटला होता यावर चर्चा सुरू होते. जिथे विषय संपला होता तिथून नव्या संवादाला सुरुवात होते. आपण पुन्हा का समोर आलो? हा प्रश्न पडतो मनाला, पण उत्तर सापडत नाही. योगायोग समजून आम्ही बोलू लागतो. दरम्यानच्या काळात पुलाखालून चांगल्या, वाईट अनुभवांचं पाणी वाहून गेलेलं असतं. आयुष्याची नदी पुन्हा एकदा नितळ, स्वच्छ आठवणींना वाहून नेत असते आणि आम्ही दोघं त्याच नदीच्या काठावर बसून आपापले जुने दिवस आठवू लागतो. दोघांच्याही मनाला पूर्वी झालेल्या वेदना, दुःख…सगळं काही आठवतं आणि आता यापुढे येणारं आयुष्य सुखाचे क्षण घेऊन यावं हीच मनोमन इच्छा असते. ही संध्याकाळ आयुष्यात नव्या आठवणींची किरणं घेऊन यावी आणि सुखाचे कवडसे दाही दिशांतून अंगावर झेलून घ्यावेत असं वाटतं. विचारांनीच मन खूप आनंदी होतं. त्यातलं एक मन म्हणतं, मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा. दुसऱ्या मनापुढे उत्तराची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. पुन्हा एका पहाटे त्याच नदीच्या काठावर बसून मनांचा संवाद सुरू होतो. तिचं मन त्याच्या मनाला अलगदपणे उत्तर देतं. इच्छा असूनही आपण आपल्याला हव्या असणाऱ्या क्षितिजापर्यंत एकत्र चालत जाऊ शकत नाही असं तिला वाटतं. आमच्या नात्यात काही गोष्टींचं अंतर आहे याची तिला जाणीव झालेली असते, पण तोवर दोन्ही मनांतलं अंतर हळूहळू कमी होत जातं.

तेव्हा एकमताने निर्णय होतो, आपण छान मित्र म्हणून राहायचं. याक्षणी असं वाटत, आमच्यात सुरू झालेला हा संवाद पुन्हा कुठेतरी थांबतो की काय? पण नेमकं उलटं होतं आणि आम्ही त्या क्षणापासून खूप बोलू लागतो. जसजसं बोलू लागलो, तसतसं आमच्या मनातलं अंतर हळूहळू कमी होऊ लागलं. बोलता-बोलता एकमेकांच्या मनाला खूप चांगलं समजून घेतलं होतं, पण तरीही  आमच्या चौकटीत राहून पुढे चालायचं ठरवलं. त्या संध्याकाळी एक विचार मनात आला, उद्या पुन्हा एकदा आपण नव्याने भेटायचं. कुठे भेटूया असा विचार मनात घोंगावत असताना तिचं मन आपसूकपणे म्हणालं, थोडं मी चालत येईन, थोडं तू चालत ये आणि  आमच्यामधल्या अंतराच्या केंद्रबिंदूजवळ भेटायचं ठरलं. तिथे उभं राहून आम्हाला ज्या क्षितिजावर जायचं होतं, तिथे खरंच पोहोचता येईल का? हा भाबडा प्रश्न आम्हीच आमच्या मनाला विचारू कदाचित. मनातल्या भावनाच आता निर्णय घेतील, आमच्या मैत्रीची गोष्ट कुठवर जाईल याचा. थोडं अंतर ती चालत आली आणि थोडं अंतर मी चालत आलो. जिथून आम्हाला आमच्या मनातलं क्षितिज दिसतंय त्या क्षितिजापर्यंत चालत जायचं असेल तर याच बिंदूपासून थोडा त्रास सहन करून एकमेकांचा हात हातात घेऊन पुढे चालत राहिलो की, अडचणींचे डोंगर सहज पार होतील. आठवणीच्या नद्या दुथडी भरून वाहू लागतील आणि मग आपल्याला जाणीव होईल की, आपली पहिली, दुसरी आणि तिसरी भेट हा निव्वळ योगायोग नसून आपल्याला एकत्र आणण्याचा देवाच्या मनातला मणिकांचन योग असावा.

[email protected]