धोनीने फक्त एक बदल सुचवला आणि शार्दूल ठाकूर सुसाट सुटला

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या शार्दूल ठाकूरने तो एक उत्तम अष्टपैलू खेळाडू असल्याचं सिद्ध केलं आहे. इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात शार्दूलने दोन्ही डावात अर्धशतक झळकावलं आणि योग्यवेळी महत्वाचे बळीही टीपले. शार्दूलने अवघड परिस्थितीतून संघाला बाहेर काढत विजय मिळवून दिल्याची ही पहिली वेळ नव्हती. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध गॅबा कसोटीमध्ये अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

शार्दूलने गेल्या काही महिन्यांपासून फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. टीम इंडियाचा थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट रघू आणि नुवान यांना भेटून शार्दूलने आपल्याला बॅटींगचं तंत्र सुधारायचं असल्याचं सांगितलं होतं. या दोघांनी शार्दूलच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करून त्याला वेगवान मारा खेळायला लावला. हे दोघे अत्यंत वेगाने बॉल फेकतात, ज्याचा मुकाबला करणं सुरुवातीला शार्दूलला अवघड गेलं होतं. मात्र फूटवर्क सुधारल्यानंतर माझ्या फलंदाजीत बराच बदल झाला असं त्याने सांगितलं.

शार्दूल ठाकूरने इंडीयन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक घटना सांगितली. आयपीएल सुरू असताना शार्दूल धोनीच्या रुममध्ये गेला होता आणि त्याने धोनीची बॅट हातात धरली होती. त्यावेळी माझी बॅटवरील पकड (ग्रीप) ही थोडी वरच्या बाजूला होती आणि धोनीने ते पाहिलं होतं असं शार्दूल म्हणाला. धोनीने मला बॅटची ग्रीप थोडी खाली धर असा सल्ला दिला. त्याचा सल्ला ऐकल्यानंतर मला फटके मारणं अधिक सोपं वाटायला लागलं असं शार्दूलने सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या