यंत्रमानव आणि मानव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेश कोळी

यंत्रयुगात माणसाचं कसं यंत्र बनून गेलंय, याचं दर्शन चार्ली चॅप्लिनने ‘मॉडर्न टाइम्स’ या त्याच्या चित्रपटात घडवलं होतं. चार्ली करुण विनोदाचा बादशहा मानला जातो. यंत्रात अडकलेला चार्ली पाहून प्रेक्षक पोट धरून हसतात; पण या विनोदाद्वारे चार्ली परिस्थितीवर तिरकस भाष्य करू पाहतो. चार्लीचा ‘ब्लॅक अँड व्हाइट’ जमाना आता ‘मॉडर्न’ राहिला नाही. आता आपण ‘पोस्ट मॉडर्न’ युगात जगतो आहोत आणि त्या काळापेक्षा सध्याचं तंत्रज्ञान अनेक पटींनी विकसित झालंय. त्यावेळी यंत्रं नवीन होती. आता यंत्रमानवही नवीन राहिलेला नाही. या यंत्रमानवात (रोबो) बऱयाच सुधारणा करून तो माणसापेक्षाही सरस कसा बनवता येईल, असा प्रयत्न सुरू आहे, परंतु माणसाची कामं करण्यासाठी बनविलेला यंत्रमानव जर माणसापेक्षाही सरस ठरला तर माणसंच त्याचे गुलाम होतील आणि यंत्रमानवांचं राज्य येईल, अशी फॅण्टसी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘रोबो’ चित्रपटात रंगविण्यात आली होती. ही फॅण्टसी आता खरी ठरते की काय, अशा उंबरठय़ावर आपण उभे आहोत. ही साधार भीती आहे की अफवा, याबाबत साशंकता आहे. आजकाल रोबोटिक्स सायन्समध्ये ज्या प्रकारे बदल घडून येत आहेत, ते पाहता एक दिवस रोबोच माणसांवर राज्य करतील, अशी अफवा (तूर्त अफवाच म्हणू या) जंगलात वणवा पसरावा तशी पसरत चालली आहे. ही अफवा रोबोटिक्स विज्ञानाच्या विश्वातच अधिक जोर धरत आहे.

रोपांती ज्या गतिमानतेने पुढे जात आहे ते पाहता भविष्यात “हे आहेत रोबोटिक्स वकील, डॉक्टर आणि आर्किटेक्ट” अशी कुणी कुणाची ओळख करून दिली तर आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. रोबोटिक्स आणि आर्टिफिशल इन्टेलिजन्स या दोन तंत्रज्ञानांच्या मिलाफातून विश्वच बदलून जाणार आहे आणि या बदलात नातेसंबंधांचाही समावेश असणार आहे. सुरुवातीला यंत्रमानव आपल्या आयुष्यात मदतनीस म्हणून येतील. हळूहळू या तंत्रज्ञानात जसजसा विकास होत जाईल, तसतशी सामाजिक दक्षता आणि कौशल्येही रोबो आत्मसात करतील. त्यानंतर मानवी वृत्ती-प्रवृत्ती त्यांच्यात भरली जाईल आणि ही यंत्रेच आपले मित्र, सगे बनतील. हळूहळू यंत्रमित्र ही संकल्पनाही सर्वसामान्य होऊन जाईल. रोबोला मित्र बनविण्याच्या संकल्पनेचा उदय माणसाच्या दीर्घायुष्यातून झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक सुविधांमुळे माणसांचे सर्वसाधारण आयुर्मान वाढते आहे आणि ज्ये… नागरिकांसोबत रहायला मात्र कुणीच नाही. भविष्यात 65 वर्षांपेक्षा जास्त वयोमान असणारी लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढेल. युवकांची संख्या मर्यादित होईल आणि उत्पादकतेचा सर्वाधिक भार त्यांच्यावरच असेल. तरुण अशा प्रकारे व्यस्त झाल्यानंतर वयोवृद्धांची देखभाल करणारे रोबो घरात येतील. स्वयंपाक करणे, घराची साफसफाई, मुलांकडून गृहपाठ करून घेणे अशा कामांसाठी रोबोच येतील. एकच रोबो जर वृद्धांची काळजी घेण्यापासून स्वयंपाकापर्यंत आणि मुलांना शाळेत पोहोचविण्यापासून छोटय़ा-मोठय़ा सूचना वेळेत देण्यापर्यंत सर्व कामे करू लागला तर प्रत्येक कामासाठी स्वतंत्र व्यक्तीच्या नेमणुकीची गरजच उरणार नाही. हळूहळू हे यंत्रमित्र गोष्टी आणि विनोद सांगू लागतील, मुलांसोबत पत्ते खेळतील, त्यांचे सुखदु:ख वाटून घेतील. अशा प्रकारे वाटचाल राहिल्यास एक ना एक दिवस रोबो हे आपले मित्र नक्कीच बनतील. हा यंत्रमित्र सातत्याने आपल्या सोबत राहून आपल्याला भावनिकदृष्टय़ा सुरक्षितता प्रदान करेल, असुरक्षित वाटू देणार नाही.

रोबोटिक्स आणि आर्टिफिशल इन्टेलिजन्सच्या क्षेत्रात सध्या जी संशोधने सुरू आहेत, त्यांचा अंतिम आविष्कार यंत्रमित्र निर्माण करणे हाच असेल. अर्थात, सध्या ‘यंत्रमित्र’ अशा स्वरूपाची वस्तू बनविणे हे शास्त्रज्ञांचे तातडीचे उद्दिष्ट नाही. सुरुवातीला लहान मुलांसाठी एक मित्र तयार करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करीत आहेत. पहिल्या टप्प्यात यंत्रमानवाने मुलांची देखभाल करणे आणि त्यांच्याशी खेळणे अपेक्षित आहे. मुलांच्या भावनिक विकासातील एकलकोंडेपणाचा, आत्मपेंद्रीपणाचा अडथळा दूर करणे हे पहिल्या टप्प्यातील यंत्रमित्रांचे काम असेल. त्याचप्रमाणे घरात एकटेपणाचा सामना करणाऱया वयोवृद्धांची जपणूकही पहिल्या टप्प्यातील यंत्रमित्राने करणे अपेक्षित आहे. केअरटेकर, नर्स म्हणून

या टप्प्यातील रोबो घरात येतील. या यंत्रमित्रांचा आकार, रंगरूप मानवी शरीराप्रमाणेच असावे आणि आपल्या आसपास माणसे नाहीत, असे वयोवृद्ध मंडळींना जाणवू नये, असा प्रयत्न सुरू आहे. मुलांसाठी बनविण्यात येणारा यंत्रमित्र अत्यंत गोंडस असावा आणि पाहताक्षणी त्याला जवळ घ्यावेसे वाटावे, असाही प्रयत्न आहे. वयोवृद्ध मंडळींशी गप्पा मारू शकणारा रोबो असा असावा की, वेळेवर सर्व सूचना तो त्यांना देऊ शकेल. त्यासाठी हा केअरटेकर रोबो माहितीने समृद्ध असावा, असा प्रयत्न आहे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा मजूर म्हणून यंत्रमानवांचा वापर सुरू झाला तेव्हा ते केवळ हातावरचे पोट असलेल्यांचे, शिक्षण नसणाऱयांचेच काम हिसकावतील असे मानले जात होते, परंतु आजमितीस जगातील मोठमोठय़ा पंपन्यांचे सीईओ, प्रसिद्ध रुग्णालयांचे डॉक्टर आणि मोठमोठे वकीलही धास्तावले आहेत. कारण ते जे काम करतात ते जवळ जवळ जसेच्या तसे अत्याधुनिक यंत्रे आणि यंत्रमानव करू लागतील, अशी धास्ती त्यांना आहे.

अर्थात, एखाद्या रुग्णाला कोणते उपचार द्यायचे आहेत हे अजूनसुद्धा रोबोटिक डॉक्टर ठरवू शकत नाहीत. अशा गोष्टी आजदेखील अनुभवी ‘मानवी डॉक्टर‘च ठरवू शकतो, परंतु तज्ञांचा अंदाज असा आहे की, हे यापुढे फार काळ चालणार नाही. काही वर्षांतच वकील, डॉक्टर आणि आर्किटेक्ट जे काम करतात, ती सर्व कामे यंत्रमानव करू लागतील. याचे कारण म्हणजे आजमितीस ज्या पेशांमध्ये तंत्रज्ञानाबरोबर व्यावसायिक विचार करणाऱया मेंदूची गरज असते अशा पेशांमधील लोकांनाही धोका जाणवू लागला आहे. दुसऱया शब्दांत सांगायचे झाल्यास त्यांच्याही अस्तित्वावर टांगती तलवार आहेच. मध्यंतरी एका मोठय़ा समूहाने अशी शंका असलेल्या विविध क्षेत्रांचा धांडोळा घेतला होता. हे सर्व तज्ञ पत्रकार असोसिएटेड प्रेस (एपी) या अमेरिकी वृत्तसंस्थेचे होते. सखोल सर्वेक्षण, बातचीत तसेच पुराव्यांच्या आधारे ही मंडळी या निष्कर्षाप्रत आली की, यांत्रिक मेंदूचे अर्थात सुधारित यंत्रमानवाचे आव्हान समोर उभे नाही, असे एकही क्षेत्र नाही. एपीच्या पत्रकारांनी जगातील वीस देशांच्या आधारावर अहवाल तयार केला होता. तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या बाबतीत सर्वात पुढारलेले मानले जाणारे हे 20 देश आहेत. एपीच्या या पत्रकारांनी या देशांमधील तंत्रज्ञानातील तज्ञ, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, बहुराष्ट्रीय पंपन्यांचे सीईओ आदींशी प्रदीर्घ चर्चा केली आणि त्या आधारावर ज्या निष्कर्षाप्रत पोहोचले ते घाबरवून टाकणारे आहेत. त्यांच्या मते, गेल्या चार-पाच वर्षांत ज्या नोकऱया बाजारपेठेतून गायब झाल्या आहेत, त्या केवळ कमी कौशल्याची गरज असणाऱया नोकऱया नाहीत. त्यात बऱयापैकी काwशल्याची गरज लागणाऱया नोकऱयाही आहेत. या नोकऱया मिळविणे ही विशेषत मध्यमवर्गीय लोकांची तीव्र इच्छा असते.

हैराण करणारी बाब अशी की, या सर्व रोजगारांवर यंत्रमानवाने एका झटक्यात नव्हे तर हळूहळू, सहजतेने कब्जा केला आहे. एखाद्याचा पर्सनल पोटरी यंत्रमानव असू शकतो, अशी कल्पना दहा वर्षांपूर्वी आपल्याला करता आली नसती, परंतु पर्सनल पोटरीचे काम किंवा त्याचे पद केवळ यांत्रिक पद्धतीने नोंदी करणे आणि कामांचा ाढम तयार करणे एवढे असत नाही तर त्यात विचार, उपामशीलता आणि तत्कालीन बुद्धीचाही समावेश असतो. हे सर्व बदल रातोरात झालेले नाहीत. अर्थतज्ञ आणि भविष्यावर नजर ठेवणारे तज्ञ हे जाणतात. ही धास्ती अनाठायी नसून ते वास्तवात एक मोठे आव्हान आणि चिंता आहे.

ऑक्सफर्डमधील विद्वान कार्ल बॅनेटिक फ्रे आणि मायकल ए. ऑसब्रोन यांनी अशी भविष्यवाणी केली आहे की, आगामी दहा वर्षांत संगणकाशी संबंधित निम्म्याहून अधिक नोकऱयांवर यंत्रमानव कब्जा करतील. हे खरोखर भयावह चित्र आहे, परंतु याबाबत काही करता येत नाही. कारण ऑटोमेशन म्हणजेच स्वचालन ही परिवर्तनाची अनिवार्य अट आहे. कारखाने, दुकाने, मॉल अशी सर्व ठिकाणे या परिवर्तनासाठी तयार झाली आहेत. जी ठिकाणे अद्याप या बदलासाठी तयार झालेली नाहीत, त्यांना तयार व्हावेच लागेल.

आश्चर्यजनक बाब अशी की, काही वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी अत्यंत कमी ज्ञान आणि काwशल्याची गरज असेल, अशाच ठिकाणी यंत्रमानवाचा धोका जाणवू लागला होता, परंतु आता याउलट असे वाटू लागले आहे की, ज्या कामांमध्ये ज्ञान आणि काwशल्याची कमीत कमी गरज असेल अशीच कामे मानवासाठी उरतील. उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी असे मानले जात होते की, वकील किंवा आर्किटेक्ट यांचे काम कोणतेही यंत्र करू शकणार नाही. कारण वकील खटल्याची मांडणी करताना सातत्यपूर्ण विचार करीत असतात आणि पहिल्यापासून जी वाट तयार झालेली आहे, त्या वाटेवरून न जाता आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून नवनवीन वाटा तयार करतात. आपल्या तका&ला सातत्याने नवा आकार ते देत असतात, परंतु आता असे वाटू लागले आहे की, असे पेशे कितीतरी अधिक पटींनी धोक्यात आहेत. कारण यंत्रे अधिक विचार करणारी असल्याचे तर सिद्ध झाले आहेच; शिवाय विचार करण्याचा वेग आणि कल्पनाशक्तीही त्यांना अधिक लाभली आहे. म्हणजेच रोबोटिक वकील केवळ पहिल्यापासून निश्चित केलेल्या प्रश्नांचीच उत्तरे शोधेल असे नव्हे, तर तातडीने समोर येणारे प्रश्न सोडविण्यासदेखील सक्षम असेल आणि मानवाने दिलेल्या उत्तरांपेक्षा त्याची उत्तरे अधिक अचूक असतील. त्याचप्रमाणे हे काम मानवाने केलेल्या कामापेक्षा कितीतरी कमी वेळात होईल.

डॉक्टरांच्या बाबतीतसुद्धा हीच बाब समोर आली आहे. डॉक्टरी पेशासुद्धा अशा प्रकारच्या नव्या आव्हानांचा मुकाबला करीत आहे. रेडिओलॉजिस्ट जे काम करीत असे, ते काम आता त्याला मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण यंत्रमानव अर्थात संगणक हे काम त्याच्यापेक्षा अधिक जलद करून अचूक निष्कर्ष काढू शकतात. एकापेक्षा एक सरस सॉफ्टवेअर तयार झाली आहेत आणि परिस्थितीचे आकलन या सॉफ्टवेअरना मानवापेक्षा अधिक चांगले असते. आजाराचे निदानही यंत्रे मानवापेक्षा अधिक सक्षमतेने करू लागली आहेत. संगणकाने विचारलेले प्रश्न लोकांना अधिक सोपे आणि अधिक समजणारे वाटत आहेत.

हे सर्व बदल कसे, कधी आणि किती कालावधीत सर्वदूर पसरतील याचे उत्तर आजच्या क्षणी देता येणार नसले तरी त्या मार्गावर आज मानवी जीवन, तुम्ही-आम्ही सारे जण प्रवास करू लागलो आहोत. इथून मागे फिरण्याचा विचार करण्याची वेळ आता निघून गेली आहे.

(लेखक संगणक अभियंता आहेत)