
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबईच्या महत्त्वाच्या चौपाटय़ांपैकी एक असलेल्या माहीम रेतीबंदर परिसराचा पर्यटनदृष्टय़ा विकास केला जाईल, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी माहीम रेतीबंदर परिसराला भेट देऊन या परिसराचा विकास आणि सुशोभीकरणाच्या दृष्टीने पाहणी केली. यावेळी नगरसेवक मिलिंद वैद्य, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, उपायुक्त हर्षद काळे, सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते.
माहीम रेतीबंदर परिसरात माहीमचा किल्ला आहे. येथून वांद्रे-वरळी सागरी सेतूचे विहंगम दृश्य नजरेस पडते. या परिसराचे सुशोभीकरण करून सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटनाच्या दृष्टीने मुंबईकरांसाठी चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकेल, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
माहीम रेतीबंदर परिसराचे सुशोभीकरण करताना भिंतीवर माहीमचा किल्ला तसेच सागरी सेतू यांच्याशी मिळतीजुळती चित्रे रेखाटावीत, रेतीचा भाग स्वच्छ करून घ्यावा, विविध शिल्पकृती तयार करून त्यामध्ये सुसंगत अशी वृक्ष लागवड करावी, माहीमचे नाव आणि सागरी सेतू यांच्याशी सुसंगत पर्यटकांना आकर्षित करणारी एलईडी लाईटची कलाकृती तयार करावी अशा विविध सूचना आदित्य ठाकरे यांनी केल्या.






























































