
गुजरातमध्ये महिसागर नदीवर बांधलेला पूल कोसळला असून, यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. पूल कोसळल्यामुळे, आतापर्यंत 5 वाहने नदीत पडल्याचे समजते. हा पूल 1985 मध्ये बांधण्यात आला होता. पूल कोसळण्याच्या घटनेबाबत रस्ते आणि बांधकाम विभागाचे सचिव पी.आर. पटेलिया म्हणाले, “गंभीरा पुलाचे नुकसान झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तज्ज्ञांची एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.”
हा पूल कोसळल्याने नदीत पडलेल्या 5 वाहनांपैकी दोन ट्रक पूर्णपणे नदीत बुडाले, तर एक टँकर अर्धा लटकत राहिला. पूल कोसळताच घटनास्थळी गोंधळ उडाला आणि बचावकार्य त्वरित सुरू करण्यात आले. हा पूल 1981 मध्ये बांधण्यात आला होता आणि 1985 मध्ये तो वाहतूकीसाठी खुला करण्यात आला होता. परंतु कालांतराने त्याची अवस्था खूपच जीर्ण झाली होती.
View this post on Instagram
स्थानिक आमदार चैतन्य सिंह यांनी आधीच या पुलाबद्दल इशारा दिला होता आणि नवीन पूल बांधण्याची मागणी केली होती. तरीही पुलावरील वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली नाही. आता सरकारने 212 कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यास मान्यता दिली आहे आणि त्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक तज्ज्ञांची एक टीम घटनास्थळी पाठवून चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातानंतर लगेचच अधिकारी सक्रिय झाले आणि नदीत पडलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वेळेत वाहनांची वाहतूक थांबवली असती आणि नवीन पुलाचे बांधकाम सुरू केले असते तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती.