
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
हिंदूंचा पवित्र महिना ‘श्रावण मास’ सुरू आहे. श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहर टाळतात तसेच उपवासाच्या दिवशी ठरलेले पदार्थच खातात. त्यात राजगिर्याचे पदार्थ अग्रस्थानी आहेत. पण या राजगिर्यात मैदा आढळल्याने खळबळ उडाली आहे.
गुजरातमधील अहमदाबाद महानगरपालिकेला तपासात राजगिर्याच्या पीठात मैदा आढळले आहे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने १२१४ नमूने घेतले असून त्यात शहरातल्या राजगिरीचे पीठ विक्री करणार्या नामवंत कंपन्यांचा समावेश आहे.
अहमदाबाद मिररने या संदर्भात एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. अधिकार्यांनी केलेल्या तपसाणीत श्री स्वामीनारायण, श्री नीळकंठ आणि राजीकर्ती या कंपन्या दोषी आढळल्या आहेत. या कंपनीतून ज्या राजगिरा पीठाचे उत्पादन झाले त्यात मैद्याचे प्रमाण आढळले. पालिकेने सुरक्षिततेचा उपाय म्हणून मावा, दाबेली, पास्ता, बर्फी, रतलामी शेव, लाल तिखट, लोणी या पदार्थांचेही १२४१ नमूने घेतले आहेत. दोषी आढळलेल्या कंपन्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे अधिकार्यांनी सांगितले.
एक किलो राजगिरा पीठाची किंमत १५० रुपये इतकी आहे, तर रोजच्या वापरात असेलेल्या पीठाची किंमत ही ४५ रुपये किलो आहे. दीडशे रुपये किंमत असलेल्या राजगिर्याच्या पीठात मैदा मिसळल्याने त्यातून उत्तम नफा कमवता येतो असे अधिकार्यांनी सांगितले. तर दुसरीकडे अशा प्रकारची भेसळ करून उपवास मोडले जातात आणि हा प्रकार म्हणजे ग्राहकांच्या श्रद्धेशी खेळ असल्याचेही सांगितले जाते.
























































