
जम्मू आणि काश्मीरमध्ये एका मोठ्या दहशतवादी कटाला उधळून लावण्यात आला आहे. शनिवारी उत्तर काश्मीरच्या सोपोर भागातील हायगाम परिसरात श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर शनिवारी एक इम्प्रोव्हायझ्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस (IED) सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सुरक्षा दलांना माहिती मिळताच लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-कश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसर सील करण्यात आला आणि महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबवण्यात आली. यावेळी वाहने दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली.
बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडने (BDS) IED ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली आणि नंतर ते सुरक्षितपणे निष्क्रिय केले. ही कारवाई सावधगिरी म्हणून करण्यात आली होती. याबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हा IED कोणी आणि का ठेवला, याचा तपास सुरू आहे. परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या घटनेमुळे दहशतवादी कट उधळून लावण्यात आला असून मोठा अनर्थ टळला आहे.






























































