
सामना प्रतिनिधी, हाळी हंडरगुळी
उदगीर तालुक्यातील मौजे हाळी हंडरगुळी येथील तब्बल 11 दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. दुकानातील रोख रक्कम घेऊन चोरटे पळाले. सिसिटीव्ही मध्ये चोरी करतानाचे चित्रण झालेले आहे. येथील बाजारपेठेतील मनोज महाजन यांच्या किराणा दुकानाचे शटर उचलून दुकानातील गल्ला तोडून बाहेर फेकला.
तसेच गल्ल्यातील रोकड 50 हजार रुपये चोरली. भगवान बच्चेवार यांच्या देशी दारू दुकानातील रोख रक्कम चोरट्यांनी चोरली. बाळू धुप्पे यांचे गंगासागर जनरल स्टोअरचे शटर तोडून गल्ल्यातील 1200 रुपये चोरले. रेनके यांचे कल्याणी फोटोच्या दुकानाचे शटर तोडून 8000 रुपये पळवले. काळवने यांचे किराणा दुकान फोडून 800 ते 1200 रक्कम चोरली. तसेच 5 ते 6 दुकानाचे कुलुपं तोडून चोरट्याने मिळेल ती रक्कम पळवली.
यातील काही दुकानदाराला चोरीची कल्पना लागताच त्यांनी चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र चोर सापडले नाहीत. चोरटे दुचाकीवरुन फरार झाले. काही दुकानातील सिसिटिव्ही कॅमेरामध्ये तीन युवक शटरचे कुलूप तोडत असताना आढळून आले आहेत. याबाबत वाढवणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण सोमवंशी म्हणाले की, सीसी टिव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध लवकरच घेतला जाईल.


























































