मेकअपमध्ये उत्स्फूर्तता महत्त्वाची!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

वक्तशीरपणा, मेकअपदादांना नमस्कार करणं हे आपल्या कलाक्षेत्रातील संस्कार अनेक बुजुर्ग कलावंत अजूनही पाळतात, सांगताहेत शशिकांत सकपाळ

ऐंशी-नव्वद साली नाटकात काम करायचो. त्यावेळी फारच कमी पैसे आम्हाला मिळायचे. तेव्हा रंगभूमीसाठी चाळीस रुपये आणि रंगभूषा करणाऱया कलाकाराला वीस रुपये मिळायचे. तेव्हापासूनच मी रंगभूषाकार झालो. या क्षेत्रात माझ्याकडून खूप काम झालं. आता गांधार संस्थेच्या कोकण कला अकादमीचं ‘कट्टी आणि बट्टी’ या नाटकासाठी रंगभूषा करत आहे. तसेच सध्या व्यावसायिक नाटक नाही. राजस्थानी, प्रायोगिक नाटकासाठी रंगभूषा करतो. आतापर्यंत मोहन जोशी, गिरीश ओक, नयना आपटे, प्रभाकर पणशीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांना रंगभूषा करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून शिकायलाही खूप मिळाले. नयना आपटे प्रयोगाच्या एक तास आधी येतात. स्वतःचा मेकअप स्वतःच करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कुठेही त्या माझं नाव सुचवायच्या. गिरीश ओकही वक्तशीरपणाबाबत काटेकोर असतात. या सगळ्या कलाकारांकडून वेळेच्या आत येऊन आपलं काम पूर्ण कसं करायचं हे मी शिकलो.

रंगदर्पण, संस्कृती कला दर्पण, कामगार कल्याण मंडळ, राज्य नाटय़स्पर्धेत रंगभूषेसाठी प्रथम क्रमांक, फक्त मेकअप न करता स्वतःच्या कामाचं वेगळेपण रंगभूषेच्या माध्यमातून साकारण्याचा माझा प्रयत्न नेहमीच असतो. पंधराव्या राज्य नाटय़ परिषदेत कल्याणच्या बोधी नाटय़ परिषदेचा पुरस्कार, अखिल भारतीय नाटय़ परिषदेकडून रंगभूषेचं सन्मानपत्र , सांस्कृतिक संचालनालयाकडून ‘केस स्टडी’, मुंबई मराठी साहित्य संघाचा गौरव पुरस्कार असे काही पुरस्कार मला मिळाले आहेत.

एखाद्या व्यक्तिरेखेच्या मेकअपसाठी पूर्वतयारी करत नाही. त्यावेळी जे सुचेल ते करतो अशी माझी पद्धत आहे. चेटकिणीपासून देवीदेवतांच्या रंगभूषा केलेल्या आहेत. रंगभूषाकाराला नमस्कार करण्याची पद्धत आजही आपले काही कलाकार पाळतात. नव्या रंगभूषाकारांना सांगेन की, अगदी मनापासून काम करा. सतत शिकत राहा. रंगभूषेतल्या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास करा. ते प्रकार हाताळा. त्या काळात आम्ही फक्त इतरांचे बघून बघून शिकलो, पण आता प्रशिक्षणाची गरज आहे. दूरदर्शनमध्ये काम करणारे अनिलकुमार जगदनी त्यांच्यासोबत मेकअप करायला जाण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून शिकत गेलो. कोणत्या व्यक्तिरेखेसाठी कशा प्रकारचा मेकअप गरजेचा आहे याचा अभ्यास होत गेला, विचार झाला त्यामुळे रंगभूषा घडत गेली.