
>> काशिराम मुंबरकर
रंगभूषा सगळंच शिकवते. डोक्यावरचे टक्कल ते कथकलीचा मेकअप साऱयांचे संस्कार घेतले.
शाळेच्या स्नेहसंमेलनात नाटकात काम करत असतानाच रंगभूषेबद्दल मला आकर्षण होतंच, पण घरातील जबाबदाऱया पार पाडताना या आवडीकडे दुर्लक्ष झालं. त्यानंतर 1980 साली नोकरी करत असतानाच ज्येष्ठ रंगभूषाकार देविदास पितळे यांच्या पत्नी माझ्याच कार्यालयात नोकरी करत असल्यामुळे माझी भेट त्यांच्याशी झाली. त्यांनी माझ्यातील रंगभूषा शिकण्याची तळमळ ओळखली. ते मला ही कला शिकवू लागले. मी नोकरी सांभाळत त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना मदत करता करता रंगभूषा शिकू लागलो. ते कापड आणि कापूस वापरून नाक किंवा एखादी जखम तयार करायचे. ते बघताना भान हरपून जायचं. त्यांनी केलेलं कलर शेडिंग इतकं हुबेहूब असायचं की एका कलाकाराची ती जखम बघून एकदा तर एकाने मलमपट्टी आणली. पितळे गुरुजींनी मला रंगभूषेतले बरेच बारकावे शिकवले आणि तेही अगदी हाताला धरून!
‘आविष्कार’, ‘कलासाधना’ अशा काही नाटय़संस्थांमध्ये काम करू लागलो. आविष्कार नाटय़संस्थेच्या ‘दुर्गा झाली गौरी’ आणि ‘आर्य चाणक्य’ या नाटकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा शिकायला मिळाल्या. 1984 साली सुयोग नाटय़संस्थेतील सुरेश ओटवणेकर आणि बाबुलनाथ कुडतरकर हे रंगभूषाकार मित्र भेटले. त्यांनीही रंगभूषेचे धडे दिले. कलेच्या प्रांगणात जेवढे शिकावे तेवढे थोडेच याची प्रचीती त्यांच्याबरोबर काम करताना आली. प्रायोगिक नाटकांसाठी कापडापासून आणि स्टॉकिंगपासून टक्कल तयार करून त्याचं फिनिशिंग कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकलो.
एकदा तामिळनाडूला गेलो असता मणिपुरी, कुचीपुडी, उडीसी आणि विशेष म्हणजे कथकली नृत्यासाठी कसा मेकअप केला जातो, हे बघण्याचीही संधी मिळाली. कथकली मेकअपचं वैशिष्टय़ हे की, तो करण्यासाठी तीन तास लागतात आणि हा रंगभूषेचा असा एकमेव प्रकार आहे जो करण्यासाठी कलाकाराला आडवं करून करतात. हा एक अविस्मरणीय अनुभव मला मिळाला. सुयोगकडून सतत तीन वर्षे उत्कृष्ठ रंगभूषाकार म्हणून गौरवण्यात आले.
पूर्वी नाटकांचे दौरे खूप व्हायचे. मुख्य सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्धी मिळवलेले कलाकारही मित्रमैत्रिणींसारखे वागायचे. सगळं वातावरण घरगुतीच असायचं. दौऱयामुळे फिरण्याची आवड पूर्ण झाली. शिर्डी, गणपतीपुळे या पवित्र स्थानी माझा सत्कार झाला. गुजराती रंगभूमी, मराठी मालिका, चित्रपटांकरिताही रंगभूषा करू लागलो. प्रसाद ओक, उमेश कामत प्रसिद्ध अभिनेते असूनही माझा आदर करतात. रंगभूषाकार असूनही मान देतात. अशावेळी रंगदेवतेप्रती कृतज्ञता वाटून कुठलीही कला असो तिच्यावर जर तुमची मनापासून श्रद्धा असेल तर ती तुम्हाला योग्य ते यश देते.




























































