रंगभूषा प्रत्येक उणीव भरून काढते

534

रंगभूषेने माझ्या आयुष्यात अनेक उणिवा भरून काढल्या. महत्त्वाचे म्हणजे त्यात आनंद भरला.

रंगभूषा हा मराठी शब्द झाला. इंग्रजीत याला मेकअप म्हणतात. हे करणं म्हणजे चेहऱ्याला रंग लावणं नव्हे. तर मेकअप म्हणजे भरून काढणं. जे नाही ते दाखवणं आणि जे आहे ते भरून काढणं. या कृतीला रंगभूषा म्हणतात. आपल्याकडे अनादीकालापासून चेहऱ्याची रंगरंगोटी केली जाते. हडप्पा, मोहोजोदडो संस्कृतीपासूनच ती साकारली जात होती.  पान, फूल, मातीचे रंग यातून चेहरे रंगवले जात असत. रंगभूषा फार जुनी आहे. आता कालानुरूप त्यात बदल होत आहेत.  त्यावेळच्या नाटकांमधून कापूर जाळून त्याची काजळी एका तेल लावलेल्या पत्र्यावर जमा करून तिचा काळा रंग म्हणून वापर केला जायचा. दाढी, मिशा काढणं, डोळे काळे केले जायचे. आपल्याकडे हा प्रकार बालगंधर्वांपासून चालत होता. त्यानंतर नव्या ब्रँडचे रंग येत गेले.

‘पारिजात’ या संस्थेतर्फे ‘उत्कृष्ट रंगभूषाकार’ म्हणून मला नुकताच पुरस्कार मिळाला. माझे सहकारी रंगभूषाकार उदय तांगडी यांनी माझं नाव सुचवलं होतं. एका सामाजिक संस्थेनं अशा वेगळ्या कामाची दखल घेणं हे माझ्यासाठी खरंच खूप मोठं होतं. त्यामुळे मी  प्रभावित झालो.

मी प्रभादेवीला राहायचो. तिथे पेंटर रांगणकर म्हणून एक नेपथ्यकार राहायचे. त्यावेळची नेपथ्य म्हणजे संगीत आणि ऐतिहासिक नाटकं असायची. त्या नाटकांना ते पडदे पुरवायचे. त्यांच्याकडे मी काम करायचो. दहा रुपये एका नाटकासाठी मिळायचे. त्या पडद्याच्या रंगातून माझं आकर्षण सुरू होतं गेलं. पडदे बांधल्यानंतर नाटक सुरू होईपर्यंत आम्हाला काहीच काम नसायचं. म्हणून आम्ही मेकअप रूममध्ये बसून मेकअप मन काय करतो, कोणते रंग कुठे वापरतो हे मी बघत बसायचो. असं करत तो प्रवास सुरू झाला. तसेच बाबुलनाथ कुडतरकर म्हणून आमच्याकडे एक रंगभूषाकार होते. त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर रंगभूषाकार म्हणून उभं केलं. कृष्णा बोरकर यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली.

दाढीमिशा लावणं, चेहऱ्यावर जखमा करणं यासाठी रंगाव्यतिरिक्तही सामान वापरावं लागतं. त्यासाठी मी कांदा-लसणाची साल , पॉपकॉर्न, श्रीखंड असं काही वेगळ्या वस्तूही वापरल्या आहेत. अगदी सिगारेटच्या पाकिटातला चमकणाऱ्या पेपरचे दात करूनही काही वेळा काही व्यक्तिरेखा साधता येतात. यासाठी प्रशिक्षणापेक्षा आपण सजग असणं महत्त्वाचं आहे. निरीक्षण आणि आत्मविश्वासातून साध्य होतं, असं मला वाटतं.

सध्या ‘खळी’ या व्यावसायिक नाटकासाठी रंगभूषा करतोय. यामध्ये एक मुलगी काळी आहे. ती पार्लरमध्ये गेल्यामुळे उजळते आणि शेवटच्या प्रवेशात अतिशय सुंदर दिसायला लागते. अशाप्रकारे एकाच मुलीसाठी  मेकअपचे तीन टोन या नाटकात करायला मिळतात. नव्या मुलांना रंगभूषेत प्रगती करण्यासाठी वाव आहे. यासाठी त्यांनी नवे बदल शिकले पाहिजेत.

आपली प्रतिक्रिया द्या