
जय मलंग… श्री मलंग, हिंदूंची वहिवाट… हीच मलंगमुक्तीची पहाट अशा जयघोषाने आज श्री मलंगगड दणाणून गेला. निमित्त होते माघी पौर्णिमेचे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने १९८२ पासून मलंगमुक्तीचा जागर सुरू झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आजही ही परंपरा अखंड सुरू आहे. या वर्षीही हर… हर… महादेव, शिवसेना जिंदाबाद असा गजर करत हजारो हिंदू भाविक मलंगगडावर जाऊन श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेत होते.
कल्याण, ठाणे, उल्हासनगर अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, पालघर, वसई, रायगड आदी परिसरांतून मोठ्या संख्येने भाविक उत्स्फूर्तपणे आले होते. भगवे ध्वज खांद्यावर घेतलेले शिवसैनिक आणि वाहनांवर फडफडणाऱ्या भगव्या पताका असे सर्वत्र भारावून टाकणारे वातावरण होते. ‘हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट’ असा नारा देत सकाळपासूनच हिंदू भाविकांचे जथ्थे गडावर जाऊन श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेत होते. पहाटे मलंगगडावर पालखी नेण्यात आल्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. दुपारी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. शिवसेनेसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह १६ हिंदुत्वादी संघटनाचे कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने गडावर उपस्थित होते.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांच्या सोयीसाठी एसटी आणि केडीएमटीच्या जादा बसेस कल्याणहून सोडण्यात आल्या होत्या. गडापासून एक किलोमीटर अंतरावर भाविकांची वाहने अडवली जात होती. यावेळी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख उपनेते गुरुनाथ खोत, उपनेते अल्ताफ शेख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, केडीएमसी नगरसेवक उमेश बोरगावकर, संकेश भोईर, अपर्णा भोईर, विशाल गारवे, नीलेश खंबायत, ठाणे नगरसेवक शहाजी खुसपे, शहरप्रमुख बाळा परब, शरद पाटील, नरेश मनेरा, अनिश गाडवे, सचिन बासरे, जिल्हा संघटक रेखा कंठे, सुवर्णा पवार, सतीश पाटील, अभिजित सावंत, युवासेनेचे गणेश नाईक, प्रतीक पाटील, उपजिल्हाप्रमुख अशोक म्हात्रे, तालुकाप्रमुख सुरेश पाटील, प्रभाकर पाटील, दत्ता खंडागळे, प्रवीण काबाडी, विनोद सावे, अरुण निंबाळकर, हेमंत चौधरी, सतीश वायचळ, किरण पाटील, उमेश म्हात्रे, अॅड. नीरज कुमार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचे अन्नछत्र
श्री मलंगगडाच्या पायथ्याशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अन्नछत्र सुरू करण्यात आले होते. यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची भूक भागवण्यासाठी शिवसैनिक दिवसभर उत्साहाने राबत होते. जवळपास १० हजार मलंगभक्तांनी अल्पोपाहार आणि भोजनाचा लाभघेतला. शिवाय ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती.
‘फ्युनिक्युलर’ला मुहूर्त मिळाला
अनेक वर्षांपासून रखडलेली फ्युनिक्युलर ट्रॉली (रोप वे) सेवा अखेर आजपासून सुरू झाली. रोप वेमुळे भाविकांना अवघ्या काही मिनिटांत मलंगगडावर पोहोचणे शक्य झाले. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना या सुविधेचा मोठा दिलासा मिळाला. फ्युनिक्युलर ट्रॉलीसाठी येता जाता १५० रुपये आकारले जात होते.


























































