मालवणचे मच्छीमार्केट चार महिन्यांनी खुले; मच्छीविक्रेत्यांनी मानले आमदार वैभव नाईक यांचे आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना पार्श्वभूमीवर 22 मार्च पासून 114 दिवस बंद असलेले मालवणचे मच्छीमार्केट शुक्रवार 17 जुलै पासून खुले झाले आहे. आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनंतर पालिका प्रशासनाने मच्छिमार्केट खुले करण्याचा निर्णय घेतल्याने मच्छीविक्रेत्यांनी आमदार नाईक यांचे आभार मानले.

दरम्यान, मत्स्यविक्रेत्या महिलांनी सोशल डिस्टनस व खबरदारी नियमांचे पालन करावे. मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच ग्राहकांनीही सुरक्षित अंतर ठेवावे. अश्या सूचना मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी मत्स्यविक्रेत्या महिलांना केल्या आहेत.

मच्छीमार्केट बंद असल्याने मत्स्यविक्रेत्या महिला बाहेर बसून मासे विक्री करत होत्या. गेले महिनाभर भर पावसात या महिला मासे विक्री करत होत्या. बंद मार्केट खुले व्हावे अशी मागणी विक्रेत्यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक व पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या सोबत बैठक घेत मच्छीमार्केट खुले करण्याची सूचना प्रशासनास दिली. त्यानंतर गेले दोन दिवस मार्केट इमारतीची साफसफाई करून शुक्रवारी मच्छीमार्केट खुले करण्यात आले.

मत्स्यविक्रेत्यांनी मानले आभार

गेले महिनाभर पावसात भिजत मासे विक्री करणाऱ्या मत्स्य विक्रेत्या महिलांचा विचार करून मच्छीमार्केट खुले करण्याची मागणी मान्य केल्याबद्दल मत्स्य विक्रेत्या महिला संघ अध्यक्षा सौ. मनीषा जाधव व उपस्थित अन्य महिलांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.