
प्रसिद्ध मल्याळम गायक एडवा बशीर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लाईव्ह शो सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवल्याने मल्याळम चित्रपटसृष्टीसह चाहतावर्ग सुन्न झाला आहे.
एडवा बशीर यांना अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. शनिवारी केरळच्या अलाप्पुझा येथे ब्लू डायमंड ऑर्केस्ट्रा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले होते. पार्श्वगायक के.जे. येसुदास यांचे ‘माना हो तुम बेहद हसीन’ हे गाणे त्यांनी यावेळी गायले. गाणे गात असतानाच ते स्टेजवर कोसळले. यानंतर तत्काळ त्यांना चेरथला येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Singer Edava Basheer collapses on stage,dies pic.twitter.com/wxWbi2JTr0
— Bangla Hunt (@BanglaHunt) May 29, 2022
मल्याळम चित्रपटांसह ते स्टेज शो साठी देखील ओळखले जात होते. ते तिरुअनंतपूरम येथील रहिवासी होते. त्यांच्या जाण्याने मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये पोकळी निर्माण झाली असून कलाकारांसह राजकीय क्षेत्रातूनही त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यासह विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांनी एडवा बशीर यांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला आहे.
एडवा बशीर हे संगीत जगतातील अनुभवी गायक होते. स्वाति थिरुनल संगीत अकादमीमधून त्यांनी संगीताची शैक्षणिक डिग्री घेतली होती. 1972 मध्ये त्यांनी ‘कोल्लम संगीतालय गणमेला मंडली’चे गठन केले होते. ‘वीना वायिकुम’ या गाण्याद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते.





























































