हिरवागार कोपरा अन् नद्यांचं हास्य

347

>>मलिका अमरशेख

खूपच दूरवर चालत आलोत आपण. कुठलंच हिरवंगार झाड, पान, फूल आपण पहात नाही आहोत आनंदानं. नुक्तं जन्मलेलं तान्हं तान्हं कोवळं मूल आपलं सोडून दुसऱयाचं आनंद कौतुकानं पहात नाही आहोत. पहिल्या पावसात भिजताना पण आपण छत्री जवळ असण्याची दक्षता घेतो.

आपण कुठल्यातरी राक्षसी वळणावर आलोय, जे प्रत्येक वळण आपल्यातला एक कुठला तरी हिस्सा खाते न् आपण तो खाऊ देतोय्…

…आपण गावापास्न, मातीपास्न, नदीपास्न खूप दूर आलोय. ईव्हन आपण शहरापास्न, समुद्रापास्न न् घरापास्न न् घराच्या भिंतीपास्न – आपल्या आई-बाप न् पोरांपास्न पण खूप खूप दूरवर आलोत. निढळावर कर ठेवून फक्त विठ्ठलाची तर सोडाच, आपल्या माणसांची पण वाट पाहण्याची गरज वाटेनाशी झालीय की काय अशी गत. आता तो हिरवागार कोपरा… पूर्ण हिरवा न् गूढ… खिडकीतून तो तेवढाच दिसतोय… अख्खं विश्वंभर सत्य त्या गूढ कोपऱयात असल्यागत मी टक लावून पहात राहते.

खूप खूप पाऊस पडल्यानं तो कोपरा हल्ली कायम हसत राहतो. मोनालिसाप्रमाणं गूढ तृप्त न् तरीही दूरस्थ… दूरस्थ न् दरवाजा न उघडणाऱया दरवाजाचचं आपल्याला आकर्षण असावं तसं… मी डोळय़ानं मनानं तो हिरवाजर्द पाचूचा कोंदणकोपरा उघडायला पाहते… खूप आत आत… तर एक अत्यंत मंजूळ पण तीक्ष्ण स्वर ऐकू येतो… ते पाखरू आहे चिमणीपेक्षाही छोटं… त्याची धारदार नाचरी शेपूट इवलीशी, पण स्वर खूप सणसणीत जाणारा बाणच…

तो हिरवा कोपरा न् ते पाखरू न् ते तीक्ष्ण स्वर… जगताच्या सांगीतिक साम्राज्यात कुठं बरं मिळतील ते… की त्या स्वरांचंच एक अनिभिषिक्त साम्राज्य? अजिंक्य? पाखरांच्या स्वरांना कुठं काय लागतं? स्पर्धा नाही, हेवा नाही – फक्त आपलं गायचं मंजुळ स्वतःच्या सुरात. कधी मादीला आकर्षित करायचं म्हणून कधी फक्त उगाचच स्वानंदासाठी… किंवा किती छान जांभूळ किंवा फुलातला मध मिळालाय म्हणून पण ते आनंद व्यक्त करत असतील.

आपण आपल्याला रिचार्ज करण्यासाठी समुद्र, नद्या, पाखरं-झाडं-धबधबे यांच्याकडे क्वचित जातो किंवा जात पण नाही. गेलो तरी आपल्याकडे तेव्हा पण मनात मेंदूत हिशेब असतात… कधी तर आपण घरी पण गेलेलो असतो… निखळ मनानं आपण नाही जात निसर्गाकडे…

आपण सेल्फी काढतो – शूट करतो – न् हे किती खूप आपण शिक्कामोर्तब करतोय् आपण इथं न असण्यावर हे आपल्या गावीही नस्तंय्. आपण पूर्णपणे आदिम मानवापेक्षा निर्घृण न् अमानुष झालेलो आहोत हे कबूल करत नाहीहोत आपण. विकासाचा काटा न् तापमापकाचा काटा एकच होतोय. बाहेरील वातावरणं बिघडलं की, आपण पण बिघडतो… मग ते कुठलं का असेना…

मूलतः आपण खात असलेल्या भाज्या- कांदा-मुळा-बटाटे… किंवा अननस – सफरचंद किंवा कोरफड – आंबा – फणस किंवा मनीप्लँट बहावा – सदाफुली – जास्वंद – पारिजातक यापेक्षा जरा जरा ।़ वरच्या दर्जाच्या सजीव आहोत हे आपल्याला मान्यच नाहीये. ते दुय्यम आहेत म्हणून आपण त्यांना खातो.

जीवो जिवस्य जिवती ते डार्विनचा सिद्धान्त…

आपण ते खूप खटोटापानंतर मान्य केले. अगदी त्यांना ठारबिर मारून झाल्यावर… पण मनानं नाही स्वीकारलंय् अजून. आपण खूप श्रेष्ठ नाही आहोत. कधी कधी जनावर न् झाडापेक्षा दुय्यम न् घाणेरडे विकृत होऊन जातो आपण.

आपण या पृथ्वीलाच काय, झाडं, जनावरं, चराचर किंवा आपले जन्मदाते यांना पण जपत नाही आहोत. पुढील पिढी आपल्या बाळमुठीत काय घेऊन येणार माहीत नाही – पण त्यात तो हिरवागार कोपरा न् नद्यांचं हास्य असेल तरच आपण असू नसताना पण! डार्विन म्हणतो तसं जो सक्षम आहे बलवान आहे तोच जगेल, पण आज सक्षमचा अर्थ ‘अर्थानं’ सक्षम!

ज्यांच्याकडे यकृत, हृदय, मेंदू ट्रान्सप्लॅन्ट करून जिवंत राहण्यासाठी लाखो रुपये आहेत, ते राहतील जिवंत जैविकदृष्टय़ा… ज्यांच्याकडे डायलिसिस करायला पैसे नाहीत त्यांनी मरावं. वाघ, सिंहाकडे पैसे नाहीत, पण ताकद आहे. म्हणून हरणानं त्यांचं भक्ष्य होणं अपरिहार्यच, पण तरीही ते जगतातच. मोठमोठे डोळे कावरेबावरे करत हिरवं गवत खातानाही ते घाबरतच खातात… गरीब माणसं पण  सर्वसामान्यपणे घाबरत घाबरतच जगतात… त्यांच्याकडे ‘अर्थ’ नसतात तरीही ते ‘अर्थपूर्ण’ जगतात असंही.

म्हणजे डार्विनचं म्हणणं शंभर टक्के खरं असलं तरी ते मानवी किंवा सजीव सृष्टीची फक्त एक बाजू आहे. आपण कुणाचे तरी भक्ष्य आहोत तरी पण मासे अंडी घालतात. जनावरं पिलांना जन्म देतात- आहे तेवढं आयुष्य हिरवंगार करण्याचा प्रयत्न करतात ही बाजू देखणीच आहे.

आपण सजीवात श्रेष्ठ आहे असं वाटूनही माणूस जास्त जास्त निगेटिव्ह होत जातो. निसर्गात आणि आपल्यात असणारं नातं तोडून काढायला पाहतो… एका विचारवंताचं फार सुंदर वाक्य आहे, ते उद्धृत केल्यावाचून रहावत नाही. माणूस माशासारखा पाण्यात वावरू लागला, पक्ष्यांसारखा आकाशात उंच उडू लागला… पण तो माणसासारखं वागू शकला नाही! अन म्हणून आणखी आणखी असंतुष्ट होत गेला!

किती खरं! आपण कुत्र्यांना शेकहॅण्ड करायला शिकवतो, माकडाला सायकल चालवायला शिकवतो, हत्तीला दोन पायांवर चालवतो, आपण विजेला बोटाच्या स्पर्शाबरहुकूम नाचायला लावतो… बाकीच्या साऱयांना आपण मानवी व्यवहार करायला भाग पाडतो! न् आपण मात्र जनावरांपेक्षा क्रूर वागतो कधी कधी न् त्यालाही गोंडस नाव देतो… आपण खूप आजारी, अशक्त आहोत. सगळेच… न् आपल्याला वाटतंय की, आपण फिट न् फाईन आहोत! काय गोड, खेदजनक, विसंगत गैरसमज!

आपली प्रतिक्रिया द्या