मुखवटे सोलताना – चौकटीबाहेरच्या जगात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

चिमण्या परत चिवचिवाट करू लागल्यात… हरणं रस्त्यावर फिरू लागलीयत… ओझोनचं भोक बुजून गेलंय न् अतिनील किरणांपासून आपण वाचलोय… कोरोना निसर्गनिर्मित असो अगर मानवनिर्मित… प्रत्येक… विघातक गोष्टीचा पारिपत्य करण्याचे अस्त्र पण आपण शोधतोच! ‘मोहिनी’, ‘नरसिंह अवतार’ या कल्पक पुराणकथा असतील, पण हाच मानवाचा न् प्रत्येक देशाचा चेहरा आहे… विध्वंसानंतर पुनर्रचना – विनाशक विरुद्ध संरक्षक- मानव – राष्ट्र – निसर्ग यांचा जसा संहारक विनाशक चेहरा हे फक्त एक रूप आहे – त्याचा दुसरा चेहरा पहा – दिलासादायक, आशादायकच आहे…

प्रत्येक शहराला स्वतःचा असा वेगळा चेहरा असतो. मुंबईचा चेहरा इतका विविधरंगी कला-उद्योग-राजकारण यातच नाही… निसर्ग व मानवी आपत्तींना पण धैर्याने तोंड देणारा मुंबईकर नाटय़-फिल्म-सूरमयी-पदन्यास-रंग… आपापली प्रतिभा कला यांना मुंबई उत्तम व्यासपीठ ठरलीय.

आपल्या देशात जे वैविध्य व समृद्धता आहे, तशीच ती अन्य देशांतही आहे. फक्त खिडकीबाहेर डोकावलं पाहिजे… संस्कृती न् इतिहास प्रत्येक शहराचा न् देशाचा अर्थात वेगळा असतोच.

‘टारझन’ लिहिणारा लेखक कधी आफ्रिकेत गेलाच नव्हता. पण तरीही ‘टारझन’ची अद्भुतरम्य जंगलची दुनिया ‘जंगलबुक’इतकीच चित्तथरारक!

आफ्रिकेत अजूनही बाहेरच्या जगाशी संबंध नसलेले लोक त्यांचे अद्भुत रिवाज राहणीमान – तर दुसरीकडे अत्युच्च विकास, तंत्रज्ञान, पॉवर, पैसा असलेली अमेरिका तर दुसरीकडे ग्रीसमधले अजस्र पिरॅमिडस् – ममीज – प्राचीन संस्कृती – गूढ लिपी.

रशियाचा पोलादी पडदा – जपानची थक्क करणारी कार्यमग्नता न् भूकंप, त्सुनामी यामध्ये शांतपणे तगून राहण्याची चिकाटी.

विविध देशाचं अवर्णनीय सौंदर्य –

चीनमधली सप्तरंगी पर्वतांची रांग – तर ऍमेझॉनचं प्रचंड खोरं – समुद्रलाटांनी डिझाईन केलेल्या वळणदार घळ्या – निसर्गनिर्मित गुहा – धबधबे सर्वच अवर्णनीय…

पण आपल्याकडल्या पुस्तकातली वर्णनं, टीव्हीवरचे छान चित्रदृश्य अशी सैर करण्यापेक्षा प्रत्येकाच्या मनात, मेंदूत काही वेगळेचे चेहरे असतात खोल रुतलेले – डोळे मिटून घ्यायचे न् प्रवासाला सुरुवात करायची…

गोव्याचा स्वच्छ – सुंदर समुद्रकिनारा – समुद्राची धीरगंभीर गाज – किनाऱ्य़ावर अंब्रेलासेटीवर पहुडताना हॉटेलमधल्या वेटरनं आणून दिलेलं फ्रायफिश, चिकन टिक्का – ब्रेड – बिर्याणी – वॉव!

नंतर एकदम इंदूरमधल्या खवैया गल्लीत गरम गरम गराडू कंद खाताना! अप्रतिम चव… रात्री 3 वाजता गरम कंद खाणं म्हणजे भारीच!

मग आठवलं बोधेगाव…नगर जिल्ह्यातल्या छोट्या गावातलं आमचं शेत – 16 एकरमध्ये हुंदडत गेलेलं बालपण! हत्तीच्या सोंडेपेक्षा मोठा वजनदार शुभ्र पाण्याचा प्रवाह… विहिरीतून पंपातून डायरेक्ट डोक्यावर!

काळ्या आभाळात हिऱ्य़ांचा लखलखता खच पडावा तसं चांदणं जे शहरात दिसतच नाही. आठवडी बाजारात खाल्लेल्या रेवड्या, शेव, बत्तासे!

संभाजीनगरच्या शाळेच्या ट्रिपबरोबर अजिंठा वेरुळ लेणी यातली शिल्पकला पाहताना मन थक्क… न् आनंद अभिमान आश्चर्य अशा कित्येक संमिश्र भावनांनी भरून आलेलं… हल्ली ही कला प्राण्यांप्रमाणेच अस्तंगत होत चाललीय.

हल्ली नाक्यानाक्यावर तकलादू निष्ठा न् प्रेमाच्या नावानं स्वतःची जाहिरात करून नाव न फोटो पदोपदी – पेपर, बोर्ड, सोशल मीडियावर टाकणारे लोक कुठं न् एवढं प्रचंड अतुलनीय अप्रतिम भव्य शिल्पप्रसाद साकार करूनही एकाचंही नाव त्या लेण्यांमध्ये दिसत नाही!

ताजमहाल बनवणाऱ्य़ांचं पण नाव नाही – पिरॅमीड, स्फिंक्स बनवणारे कोण ते आपल्याला माहीत नाही… न् आपल्याला त्याची उत्सुकता पण नसते… हे वाईट. जणू काय तोंडात बोटं घालायला लावणारं अद्भुत ललामभूत असं काम करणारे ते कारागीर म्हणजे रस्ता बांधणारे, इमारतींवर मजले चढवणारे गवंडी किंवा इंजिनीयरच! आपण आनंदाने रस्त्यांवरून चालतो – आनंदाने इमारतीचे जिने चढतो – घरात राहतो – मग ते जर सुंदर बनवलं असलं म्हणून काय झालं? घराचे पैसे दिलेत. रस्त्याचे टॅक्स भरतोच ना! तोच नियम यांना पण लागू का? निसर्गाच्या निर्मितीत न् शहर देशांच्या सौंदर्यात चारचांद लावणारे कारागीर हाही त्या त्या देशाचा सुंदर चेहराच आहे!

– आज आपण घरात खितपत पडलोय. पण चिमण्या परत चिवचिवाट करू लागल्यात… हरणं रस्त्यावर फिरू लागलीयत… ओझोनचं भोक बुजून गेलंय न् अतिनील किरणांपासून आपण वाचलोय… कोरोना निसर्गनिर्मित असो अगर मानवनिर्मित… प्रत्येक… विघातक गोष्टीचा पारिपत्य करण्याचे अस्त्र पण आपण शोधतोच! ‘मोहिनी’, ‘नरसिंह अवतार’ या कल्पक पुराणकथा असतील, पण हाच मानवाचा न् प्रत्येक देशाचा चेहरा आहे… विध्वंसानंतर पुनर्रचना – विनाशक विरुद्ध संरक्षक- मानव – राष्ट्र – निसर्ग यांचा जसा संहारक विनाशक चेहरा हे फक्त एक रूप आहे – त्याचा दुसरा चेहरा पहा – दिलासादायक आशादायकच आहे…

आज एका कवीचं वचन आठवलंय…

‘‘सुनी सुनी जिंदगी की राह है ।

भटकी भटकी हर नजर निगाह है।

राह को सवार दो… निगाह को निखार दो।

आदमी हो तुम भी उठो

आदमी को प्यार दो दुलार दो।

जिंदगी की घाट को पहाड से उतार दो।’’

[email protected]