
सामना ऑनलाईन, मुंबई
मल्लखांब या महाराष्ट्राच्या मातीतल्या खेळाचा पहिला वर्ल्ड कप शनिवारपासून मुंबईतील शिवाजी पार्क येथे खेळवण्यात येणार आहे. विश्व मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने हिंदुस्थानी मल्लखांब महासंघ व महाराष्ट्र हौशी मल्लखांब यांच्या विद्यमाने व श्री समर्थ व्यायाम मंदिर यांच्या वतीने या मानाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचा ‘शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव’ पुरस्कार मिळालेल्या उदय देशपांडे यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिवाचे रान केले आहे. आता उद्यापासून 14 संघ जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावतील. क्रीडामंत्री विनोद तावडे, खासदार राहुल शेवाळे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
मल्लखांबावरील अग्निदिव्य
बीडचा नामवंत युवा मल्लखांबपटू आणि ‘मल्लखांब महागुरू’ उदय देशपांडे यांचा शिष्य उमेश कदम शनिवारी दादरच्या समर्थ व्यायामशाळा प्रांगणात मल्लखांबावरील अग्निदिव्याचे प्रदर्शन मुंबईकरांना घडवणार आहे. तोंडात आणि हातात आगीचे पेटते 9 चुडते घेऊन उमेश मल्लखांबावरील कसरती करणार आहे. उमेश हा खामगाव (बुलढाणा) येथील शिवाजीनगरचा रहिवासी असून त्याने राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धांत नेत्रदीपक कामगिरी साकारली आहे. शनिवारी 16 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता आयोजित उमेशचे मल्लखांबावरील अग्निदिव्य पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठय़ा संख्येने शिवाजी पार्कवर उपस्थित रहावे असे आवाहन उदय देशपांडे यांनी केले आहे.






























































