निवडणूक आली की चर्चमध्ये जाणारे मोदी अल्पसंख्यांकावरील हल्ल्याबाबत मौन राहतात, ‘सिलेक्टीव्ह टार्गेटिंग’ व ‘बुलडोझर पॉलिटिक्स’ लोकशाहीसाठी धोक्याची घंटा! – खरगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘मिया’ (बंगाली भाषिक मुस्लिम) समुदायाबाबत केलेल्या विधानाचा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम समाजाला लक्ष्य करून विधान केले आहे, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. हे मुख्यमंत्री नेहमीच ध्रुवीकरणाच्या गोष्टी करतात आणि मुस्लिमांच्या विरोधात बोलतात, अशी टीका खरगे यांनी बुधवारी राज्यसभेत केली.

ते पुढे म्हणाले की, देशात ‘सिलेक्टिव्ह टार्गेटिंग’ (निवडकपणे लक्ष्य करणे) आणि ‘बुलडोझर पॉलिटिक्स’चा धोरणात्मक वापर केला जात आहे. मध्य प्रदेश, ओडिशा, दिल्ली, छत्तीसगड आणि केरळ यांसारख्या राज्यांमध्ये चर्चवर हल्ले होत आहेत.नरेंद्र मोदी केरळमध्ये निवडणुका आल्यावर चर्चमधील प्रार्थनेला जातात, परंतु त्यांच्यावर (ख्रिश्चन समाजावर) होणाऱ्या हल्ल्यांबाबत मात्र मौन बाळगतात.

अल्पसंख्याकांच्या विरोधात आक्षेपार्ह, प्रक्षोभक आणि विभाजक भाषणांना प्रोत्साहन दिले जात आहे. भाजपचा प्रवक्ता होण्यासाठी ‘द्वेषपूर्ण भाषण’ हीच जणू पात्रता ठरली आहे. जो अल्पसंख्याकांच्या विरोधात जेवढं जास्त बोलेल, तो भाजपचा तेवढा मोठा संरक्षक बनतो. परंतु, यामुळे देशाच्या प्रतिमेचे नुकसान होत आहे आणि संविधानाची जी मूळ मूल्ये आहेत, ती कमकुवत होत आहेत, अशी टीका खरगे यांनी केली.

आम्हाला या गोष्टीचे दुःख आहे की, महामहिम राष्ट्रपतींनी गरिबी आणि दुर्बल घटकांच्या वेदना स्वतः पाहिल्या आहेत, तरीही त्यांच्या अभिभाषणात या चिंतेची कोणतीही झलक दिसत नाही. तुम्हाला विकसित हिंदुस्थान’ द्वेष आणि विभाजनाच्या पायावर उभा करायचा आहे का? असा सवालही खरगे यांनी केला.