
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
घराघरात कुपोषण वाचल्यावर दचकला असाल ना? कुपोषण म्हणजे नक्की काय? हे त्यासाठी समजून घ्यावे लागेल. त्यासाठी कुपोषणाचा अर्थ बघणे आवश्यक आहे. पोषण म्हणजे शरीराची व त्याचबरोबर मनाची योग्य वाढ. त्यासाठी आवश्यकता आहे योग्य संतुलित आहार आणि त्याचबरोबर योग्य संस्कारांची.
पूर्वी वर्तमानपत्रांत मेळघाटातील कुपोषणाच्या बातम्या भरपूर यायच्या. आता तिथे कुपोषण होत नसेल किंवा त्याच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत नसतील कदाचित, पण सध्या सगळीकडे धनधान्यांची रेलचेल, सुबत्ता असूनही घराघरांत कुपोषण आढळून येऊ लागलंय. त्यासाठी कुठल्या दुष्काळी अथवा ग्रामीण भागात जाण्याची आवश्यकता नाही. अगदी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या शहरांतही हे कुपोषण घराघरांत दिसू लागले आहे.
प्रथम आपण आहाराचा विचार करूया. अनेक माता आपल्या मुलांबद्दल “काहीही खात नाही” ही पार घेऊन आम्हा डॉक्टरांकडे येत असतात. ओपीडीत गर्दी असणारा डॉक्टर पटकन भूक लागण्याचे औषध लिहून देऊन खोटी भूक वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे मूल अधिक खायला लागते. दिवसभर झोपाळू पण बनते. ही वाढलेली खोटी भूक पुन्हा औषध बंद केल्यावर पूर्ववत कमी होते. पुन्हा जैसे थे!
मूल खात नाही, असं का? आयांनो, तुम्ही मुलांचे लहानपण आठवा. कधीतरी त्यांना भूक लागली म्हणून रडल्यावरच खायला दिलेत की तुमच्या सोयीप्रमाणे वेळ झाली की, भूक नसतानाही भरवलंत? बहुतेक स्त्रियांचे उत्तर “भूक नसतानाही भरवले” असे असेल. आता हे एक हातातले काम संपवावे यादृष्टीने भरवायला घेतलं असंच असेऴ. त्यांना नैसर्गिक भुकेची जाणीवच होत नाही. मग हळूहळू मुलांना अन्न समोर आलं तरी नको वाटायला लागतं आणि घरातील कुपोषण सुरू होते.
गाडी व्यवस्थित चालण्यासाठी पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनाची गरज असते. इथे तर मुलाच्या रोजच्या व्यवहाराबरोबरच त्याच्या योग्य वाढीचाही प्रश्न आहे. त्यासाठी कुठला आहार तुम्ही देता हे महत्त्वाचे आहे. आपल्या देशाची एकविसाव्या शतकात प्रगती धडाक्यात व्हावी असे वाटत असेल तर प्रत्येक पालकाने आपले मूल सुदृढ कसं होईल, हे पाहायला हवं. नुसतं पौष्टिक आहारच नव्हे, तर शारीरिक कष्ट घेण्याची ताकदही त्याच्यात निर्माण करणे आवश्यक आहे.
आहारातील कुपोषणाचे दोन प्रकार आहेत-
1) कमी प्रमाणात आहार
2) अधिक प्रमाणात आहार
कमी प्रमाणात आहार घेणाऱया मुलांचे पाऴक सतत “हा खात नाही” अशी पार घेऊन डॉक्टरकडे येतात. चिडका स्वभाव, भाज्या व इतर पदार्थांविषयी आवडनिवड या समस्या आई सांगत असते, पण यात बहुतेक वेळा घरातल्या कुणाचे तरी अनुकरण लहान मुलं करत असतात. उदाहरणार्थ, बाबा भरल्या ताटावर बसून टीका करणारे असतील, “ही काय भाजी केली आहे,” तर मूलही तसेच वागू लागते. घराघरांत आजी-आई मुलाचे कौतुक सगळ्यांना सांगत असते की, “हे याला आवडत नाही”, “हे तो खात नाही” हे ऐकून मुलंही तोच विचार करू लागतात.
अभ्यासाने गांजलेलं मूल, घरात सतत भीतीचे वातावरण किंवा अति लाडाचे वातावरण असेल तर कुठल्याही बाबतीत निषेध दाखवण्याचा मार्ग म्हणजे जेवण हे समजून जाते. त्यामुळे जेवत नसेल तर फक्त मूल नाही, घरातील सर्वांना तपासण्याची गरज आहे.
अधिक प्रमाणात आहार असेल तर मुलांना सहसा डॉक्टरकडे आणले जात नाही. आसपासचे सर्वजण त्याची तब्येत किती छान आहे, हे सांगून नावाजत असतात. मूल जाडे होणे म्हणजे तब्येत चांगली असणे असा समज समाजात का आहे? हे अजून एक कोडे आहे. मात्र याचा दुष्परिणाम होऊन ते मूल अजून सुस्त होते, हालचाली कमी करते, अपचनाच्या पारी सुरू होतात, अति गोड पिष्टमय पदार्थ खाऊन बुद्धिमांद्य होते, अभ्यासात मागे पडू लागते. तसेच सतत पौष्टिक पदार्थ बनवण्याकडे कल म्हणजे उदाहरणार्थ तेलतूप, ड्राय फ्रुट्स अशा गोष्टींचा वापर हा खूप वाढत चाललाय. अशा वेळी पालकांना अत्यंत जागरूकता दाखवणे गरजेचे आहे.
नक्की आहाराचे प्रमाण व त्याचे स्वरूप काय असावे, हे आपण आपल्या फॅमिली डॉक्टरला विचारून ठरवावे. साधारण त्याची मार्गदर्शक तत्त्वं अशी आहेत की, चार पायऱयांमध्ये आपण याची विभागणी करू.
1) मूल जन्मल्यापासून चौथ्या महिन्यापर्यंत
2) चौथ्या महिन्यापासून पाच वर्षापर्यंत
3) सहा वर्षापासून ते पंधरा वर्षांपर्यंत
4) 15 वर्षांपासून पुढे
जन्मापासून चौथ्या महिन्यापर्यंत वेगळा आहार सांगण्याची गरज नाही. आईचे दूध हे सर्वात उत्तम अन्न आहे. ते जर काही कारणाने उपलब्ध नसेल तर बालरोगतज्ञांचा सल्ला घेऊन त्यास पर्याय शोधणे आवश्यक आहे. चौथ्या महिन्यापासून पुढे वर्ष-दीड वर्षापर्यंत जर ती आई बाळाला जास्त प्रमाणात दूध पाजत असेल तर बाळाच्या आईचा आहार पण तितकाच सकस आणि परिपूर्ण असला पाहिजे.
चौथ्या महिन्यापासून चालावयास लागेपर्यंत आहाराला योग्य प्रमाणात प्रथिने, सर्व जीवनसत्त्वे व शरीराच्या वाढीला आवश्यक असणारी मूलद्रव्ये आहारात असणे गरजेचे आहे.
पाच वर्षापर्यंत लहान मुलांना दात येण्यापासून त्यांची शारीरिक वाढ झपाटय़ाने होण्यापर्यंत प्रािढया चालू असते. या महत्त्वाच्या वेळी काही आया मुलांना सगळे पदार्थ मिक्सरमध्ये काढून गुरगटय़ा अन्न करून भरवतात. लहान मुलांना शक्यतो लवकरात लवकर स्वतचे स्वत खायला शिकवणं गरजेचं आहे. सगळ्यांबरोबर त्यांनाही एक ताट जेवायला द्यावे. सर्व पदार्थ थोडय़ा प्रमाणात जे आपण जेवणार आहोत; तिखट, गोड, आंबट या सगळ्या चवी त्यांना स्वत घेऊन द्याव्यात. अन्नाची उडवाउडव होईल कदाचित सुरुवातीला, पण हळूहळू मुलं स्वतच स्वत खायला शिकतील.तिसऱया टप्प्यात साधारण सहा ते पंधरा वर्षांपर्यंत मुले शाळेत, कॉलेजमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना योग्य पद्धतीने जीवनसत्त्वे आहारात जाणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यायाम, मैदानी खेळ खेळण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा. आई-वडिलांना योग्य पद्धतीने घरात व्यायाम करण्याची सवय असेल तर ते मुलांना लहानपणापासून मनावर ठसते.
शक्यतो आहाराच्या कल्पना सोशल मीडियावर येणाऱया दोन मिनिटांच्या क्लिपवर ठरवू नका. प्रचंड गोंधळ निर्माण होईल. योग्य पुस्तकांचे वाचन, तज्ञांचा सल्ला घ्याल तर परिणाम अधिक चांगले होतील.