
कोरोना सावटाखाली साजरा होणारा गणेशोत्सव सर्वत्र अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे. रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांना मालवणात भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
दरम्यान, शासनाच्या नियमावली नुसार चार व्यक्तींना गणपती सोबत समुद्र किनारी विसर्जनास जाऊन येण्यास पोलिसांनी परवानगी दिली होती. तर 10 वर्षाखालील मुले व 60 वर्षा वरील जेष्ठ व्यक्तींना किनाऱ्यावर जाण्यास परवानगी नाकारली. कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी नियमानुसार आम्ही सर्वत्र बंदोबस्त ठेवून कार्यवाही करत असल्याचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी सांगितले. तर यापुढेही नियमानुसार कार्यवाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मालवण शहरात अनेक ठिकाणी समुद्र किनारी तसेच नदी, वहाळ या ठिकाणी गणपती बाप्पांचे प्रथे प्रमाणे विसर्जन होते. मालवण बंदर जेटी येथे बाजारपेठ, पिंपळ पार मार्गे मोठ्या संख्येने गणपती विसर्जनास येतात. मात्र या ठिकाणी कडक बंदोबस्त होता. पोलीस निरीक्षक स्वतः उपस्थित होते. दरम्यान, पोलिसांनी नियमावलीकडे बोट ठेवल्याने काहीजणांनी नाराजी व्यक्त केली. तर अनेकांनी समंजसपणा दाखवत पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले. हे सगळे आपल्या सुरक्षिततेसाठी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
मालवण शहर व परिसरात सुमारे 750 गणपती बाप्पांचे विसर्जन
मालवण शहरात गणेशोत्सव काळात नगराध्यक्ष महेश कंदळगावकर यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी लाईट व अन्य व्यवस्था होती. स्वतः नगराध्यक्ष किनाऱ्यावर उपस्थित राहत लक्ष ठेवून होते. मालवण शहर व परिसरात सुमारे 750 गणपती बाप्पांचे दीड दिवसानी विसर्जन करण्यात आले.



























































