
सामना प्रतिनिधी। मालवण
दक्षिणपूर्व अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्याचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर रविवार रात्री जाणवला.
गडगडाट व लखलखाटासह पाऊस कोसळला. शहर रेवताळे भागात वीज कोसळून अशोक मांजरेकर यांचा माड जळाला तसेच या भागातील अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली. तसेच अवकाळी पावसामुळे मासेमारी व पर्यटनावर काहीसा परिणाम झाला.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी चक्रीवादळाचा इशारा कायम ठेवला असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना हवामान व मत्स्यव्यवसाय विभागाने केली आहे. तसेच बंदर विभागाने मच्छीमारांना खबरदारी म्हणून एक नंबरचा बावटा लावला आहे.
मध्यरात्री १ वाजल्यापासून विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह मालवणात पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा जोरदार कडकडाट रात्रभर सुरू राहिल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या विजेचा फटका मालवण शहरातील रेवतळे भागाला बसला. रेवतळे येथे अशोक मांजरेकर यांच्या माडावर वीज कोसळल्याने माड जळाला. तसेच या विजेमुळे रेवतळे मधील सुमारे 25 पेक्षा जास्त घरातील सेट टॉप बॉक्स, फ्रीज यासह अन्य विद्युत उपकरणे नादुरुस्त झाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन हिवाळ्यात या अवकाळी पावसामुळे बहरात येत असलेल्या आंबा कलमांचेही मोठे नुकसान झाले आहे. रात्रभर कोसळणारा पाऊस सकाळी थांबल्यानंतर मालवणात दिवसभर ढगाळ वातावरण होते.




























































