
सामना प्रतिनिधी । मालवण
परतीच्या पावसाचा कहर सिंधुदुर्गात सुरूच आहे. मालवणात मंगळवारी सायंकाळी गडगडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. कुंभारमाठ येथील मधुकर चव्हाण यांच्या घरावर वीज कोसळल्याने विजेच्या सर्व वस्तू जळून खाक झाल्या. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत घरामागे असलेली सुनीता चव्हाण ही महिला चक्कर येऊन पडली. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
मधुकर चव्हाण यांच्या घरालगत असलेल्या शौचालयाच्या स्लॅबवर विजेचा लोळ कोसळून तो घरात घुसला. प्रसंगावधान राखत घरातील १५ जणांनी घराबाहेर धाव घेतल्याने ते बचावले. तर घराच्या पाठीमागे असलेल्या सुनीता चव्हाण या चक्कर येऊन पडल्या. मात्र त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. वीज घरात घुसल्याने घरातील लाईटचे वायरिंग, फ्रीज, पंखे तसेच अन्य विजेचे साहित्य जाळून खाक झाले. यात चव्हाण यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच उपसरपंच बाळा माने यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.





























































