मालवण बाजारपेठ 45 दिवसांनंतर सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये उद्योग-व्यवसायासाठी काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मालवण शहरातील बाजारपेठही गुरुवारपासून सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बाजारपेठेत रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी खुली राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा दुकाने वगळता अन्य सर्व दुकानांसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टन्स व अन्य खबरदारीच्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.

प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तहसील कार्यालयात बैठक झाली. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी जयंत जावडेकर आदी प्रशासन प्रमुख तसेच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीन तायशेटये, मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्यासह अन्य व्यापारी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत बाजारपेठ प्रमुख मार्ग व त्याला जोडणाऱ्या गल्ली मार्गावर असलेली दुकाने एका दिवशी एका बाजूची दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची खुली करण्यास एकमत झाले. दुकानमालकांनी खबरदारी उपाययोजना करण्यासह ग्राहकांची नाव नोंद ठेवणे बंधनकारक आहे. शहरात दुचाकींना परवानगी नाही. मात्र, ग्रामीण भागात दुचाकींना परवानगी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे शहरात दुचाकीचे पास नाहीत असे ग्राहक, व्यापारी अथवा दुकानातील कर्मचारी ग्रामीण भागातून मालवण बाजारपेठ येथे येत असतील तर त्यांनी आपल्या दुचाकी कोळंब, आडारी, वायरी अथवा कुंभारमाठ हद्दीत ठेवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे. शहरातील बाजारपेठ रस्त्यावर गावठी भाजीपाला विक्रीसाठी जे शेतकरी, ग्रामस्थ येतात त्यांनी सकाळी 7 ते 11 या वेळेत व्यवसाय करावा. असेही बैठकीत निश्चित करण्यात आले. एकूणच बाजपेठेत गर्दी होणार नाही, दुकानासमोर गर्दी होणार नाही याची काळजी व्यापारी बांधवांनी घ्यावी, अन्यथा पालिका प्रशासनास कारवाई करणे भाग पडेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

तंबाखू, गुटखा, सुपारी विक्री करणाऱ्या टपऱ्या बंदच राहणार आहेत. त्या बरोबर पान, तंबाखू, गुटखा, सुपारी खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई केली जाणार आहे, असेही प्रांताधिकारी यांनी स्पष्ट केले. तर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या वडापावच्या गाड्याला परवानगी देण्यात आलेली नाही. शहरातील सलून व्यवसायास परवानगी कधी मिळणार असा सवाल अजय शिंदे यांनी उपस्थित केला. यावेळी प्रांताधिकारी म्हणाले शहरातील सलून, स्पा, ब्युटी पार्लर, मसाज सेंटर बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, ग्रामीण भागातील सलून सुरू ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे शासनाकडून शहरातील सलून सुरू करा असे आदेश येत नाहीत तोपर्यंत सलून बंदच राहतील, असे प्रांताधिकारी यांनी स्पष्ट केले.