पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण, नगरपरिषदेच्या कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण नगरपरिषदचे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक विजय खरात व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश कोकेरे यांना मारहाण करणा-या मंदार कांदळकर या युवकावर गुन्हा नोंद असताना तीन दिवस उलटूनही त्याला पोलीस प्रशासनाने अटक केली नाही. पोलीस प्रशासनाच्या या कारभाराचा निषेधार्थ सोमवारी नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन छेडले. कर्मचारी वर्गाच्या कामबंद आंदोलनात सफाई विभागाचे कंत्राटी कर्मचारीही सहभागी झाले. त्यामुळे नगरपरिषद कार्यालय व शहरातील स्वच्छता विभागाचा सर्वच कारभार सोमवारी ठप्प झाला होता.

जोपर्यंत संशयिताला अटक होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा न. प. कर्मचा-यांनी दिला. नगपरिषद कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन छेडत पोलीस ठाण्यात धडक देणार अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनीत चौधरी व पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांनी नगरपरिषद येथे धाव घेत न. प. कर्मचारयांची भेट घेतली. मारहाण करणा-या युवकाकडे मनोरूग्ण असल्याचे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे संबधित संशयित युवकाच्या अटकेबाबत न्यायालयाच्या गाईड लाईन व सरकारी वकीलांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे. नियमानुसारच अटकेची कारवाई होईल असे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले.

पोलिसांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेनंतर न. प. कर्मचारी आक्रमक झाले. मंदार कांदळकर याने 21 डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या कर्मचा-यांना मारहाण केली. त्यावेळी त्याच्याकडे मनोरूग्ण असल्याचे प्रमाणपत्र नव्हते. 22 रोजी त्याच्याकडे मनोरूग्ण असल्याचे प्रमाणपत्र आले. मग कांदळकर याला 21 रोजीच का अटक करण्यात आली नाही? असा सवाल नगरपालिका कर्मचारी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर पाटकर, मालवण नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश कोकरे व उपस्थित न. प. कर्मचा-यांनी केला. नगराध्यक्ष महेश कांदळकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेवक दीपक पाटकर हेही आक्रमक झाले. नगरपरिषदेच्या कर्मचायांना मारहाण करणा-या मंदार कांदळकर याच्याकडून वारंवार मारहाणीच्या घडत आहेत. भविष्यात तो युवक सर्वसामान्य नागरिक व लोकप्रतिनिधी यांनाही मारेल? मग काय करायचे? त्यामुळे संबधित युवकावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. अशी आक्रमक भूमिका मांडण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती आप्पा लुडबे, नगरसेवक गणेश कुशे, पंकज सादये, दीपक पाटकर, यतीन खोत, मंदार केणी तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

नाहीतर आम्हाला पिस्तुल तरी द्या

शुक्रवारी सायंकाळी स्वच्छता मुकादम रमेश कोकरे व स्वच्छता निरीक्षक विजय शामसुंदर खरात हे गटारात साचलेल्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याची पाहणी व त्याबाबत कारवाई करण्यास गेले होते. यावेळी मंदार कांदळकर या युवकाने तेथे येऊन रमेश कोकरे व विजय खरात यांना शिवीगाळ करीत कानशिलात लगावली. गुन्हा दाखल झाला मात्र अटकेची कारवाई पोलीस करत नाहीत. दुसरीकडे आमच्या सुरक्षेची हमी नाही. अश्या स्थितीत आम्ही व कर्मचारी वर्गाने काम करावे असे वाटत असेल तर आम्हाला ‘पिस्तुल तरी द्या’ अशी संतप्त भूमिका कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटकर यांनी मांडली.