मालवणमधील चिवला बीचवर राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा

646

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या वतीने दहावी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा रविवार १५ डिसेंबर रोजी ‘चिवला बीच’ मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी २९ जिल्ह्यातील एक हजार पेक्षा जास्त स्पर्धकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपली नावनोंदणी १० डिसेंबर पर्यंत करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व राज्य जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजेंद्र पालकर यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवलेल्या गुणवंत खेळाडूंसह बाल, वृध्द, महिला, पुरुष व दिव्यांग-गतिमंद अश्या एक हजार पेक्षा जास्त स्पर्धकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच काही राज्यातून निमंत्रक स्पर्धकही सहभागी होणार आहेत. विविध १२ गटातून ६ ते ८५ वर्षे वयोगटातील स्पर्धक समुद्रात झेपावणार आहेत. प्रत्येक गटात प्रथम १० जलतरणपटूना मेडल प्रमाणपत्र, पदक, रोखरक्कम व भेटवस्तू देण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यातील स्पर्धक जास्त पारितोषिक मिळवतील त्या जिल्ह्यांचाही विशेष गौरव केला जाणार आहे. स्पर्धकांच्या सुरक्षेसाठी २५ जणांची विशेष बचाव टीम समुद्रात तैनात असणार आहे. यासह स्पीड बोट, जीवरक्षक तसेच किनाऱ्यावर आरोग्य पथक रुग्णवाहिका सेवेत असणार आहे.

सलग १० वर्षे मालवण चिवला बीचवर रंगणाऱ्या या स्पर्धेला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी स्पर्धेच्या इतिहासातील १० हजारावा स्पर्धक सहभागी होऊन स्पर्धा पूर्ण केली. एखाद्या सागरी जलतरण स्पर्धेचा विचार करता हा विक्रम आहे. दिव्यांग व गतिमंद मुलांचा एक वेगळा गट या स्पर्धेत गेल्यावर्षी पासून सहभागी करून घेण्यात आला आहे. शहरी भागात होणाऱ्या या स्पर्धा दहा वर्षे मालवणात होत असून ग्रामीण भागातील स्पर्धक मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या