भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांवर हल्ले होत आहेत, ममता बॅनर्जी यांचा आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांवर होणाऱ्या हिंसाचाराची तीव्र निंदा केली आहे. विशेषतः ओडिशामधील एका घटनेचा संदर्भ देत त्यांनी भाजपवर थेट आरोप केला की, भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांना निवडकपणे लक्ष्य केले जात आहे.

ओडिशाच्या संबलपूर येथे २४ डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर परिसरातील एका तरुण स्थलांतरित कामगाराची मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “भाजपशासित प्रत्येक राज्यात बंगाली भाषिकांवर क्रूर अत्याचार आणि छळ होत आहे. आम्ही या हिंसाचाराची तीव्र निंदा करतो.”

त्या म्हणाल्या, “बंगाली भाषा बोलणे हा गुन्हा नाही. आमची तृणमूल सरकार अशा पीडित कुटुंबियांच्यापाठीशी खंबीरपणे उभी आहे. अशा घटनांमध्ये मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येईल.” दरम्यान, मुर्शिदाबादमधील ज्यूएल राणा नावाच्या तरुणाच्या हत्येनंतर बंगाल सरकारने जीरो एफआयआर दाखल केला असून, बंगाल पोलीस ओडिशात जाऊन तपास करणार आहेत. ओडिशा पोलिसांनी या प्रकरणात ६ जणांना अटक केली आहे.