
‘आज न्याय बंद दाराआड रडत आहे’, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर (ECI) कडाडून हल्ला चढवला. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) प्रक्रियेला आव्हान देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी आज थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कक्षात प्रवेश केला आणि आपली बाजू मांडली.
निवडणूक आयोगाकडून मतदार यादी सुधारण्यासाठी (SIR) जी मोहीम राबवली जात आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. सरन्यायाधीशांनी त्यांना १५ मिनिटे आपली बाजू मांडण्याची परवानगी दिली. यावेळी त्यांनी आयोगावर पक्षपातीपणाचे गंभीर आरोप केले.
ममता बॅनर्जींनी केलेल्या युक्तिवादात म्हटले आहे की, ‘मी निवडणूक आयोगाला सहा वेळा पत्रे लिहिली, पण एकदाही उत्तर मिळाले नाही. आम्हाला कुठेच न्याय मिळत नाहीये’, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
नोबेल विजेते अमर्त्य सेन, कवी जॉय गोस्वामी आणि खासदार दीपक अधिकारी यांसारख्या दिग्गज व्यक्तींनाही आयोगाने नोटिसा पाठवल्याचा दावा त्यांनी केला.
लग्नानंतर आडनाव बदलल्यामुळे महिलांची नावे यादीतून वगळली जात आहेत. केवळ स्पेलिंगमधील चुकांमुळे लोकांचे मतदानाचे हक्क हिरावले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
‘इतर राज्यांमध्ये अधिवास प्रमाणपत्र (Domicile) चालते, मग केवळ बंगाललाच निवडणुकांच्या तोंडावर का लक्ष्य केले जात आहे? हा बंगालला ‘बुलडोज’ करण्याचा प्रयत्न आहे’, असे त्या म्हणाल्या.
सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. एम. पांचोली यांच्या खंडपीठाने ममता बॅनर्जी यांची याचिका गंभीर असल्याचे मान्य केले. न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून, ‘तुमच्या अधिकाऱ्यांना थोडे समंजसपणे वागायला सांगा’, अशा शब्दांत आयोगाला सुनावले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता सोमवारी होणार आहे.
ममता बॅनर्जी यांनी हात जोडून न्यायालयाला विनंती केली की, ‘लोकांच्या हक्कांचे संरक्षण करा.’ या संपूर्ण सुनावणीदरम्यान बंगालमधील तणावपूर्ण राजकीय वातावरण न्यायालयाच्या कक्षातही दिसून आले.
Justice Crying Behind Doors: Mamata Banerjee Slams EC in Supreme Court
West Bengal CM Mamata Banerjee personally argued in Supreme Court against the ECI’s Special Intensive Revision (SIR) of voter rolls. Court issued notice to EC. Read full details.



























































