
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेल प्रमुखांच्या ठिकाणांवर ईडीने छापे मारल्यानंतर पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी भडकल्या आहेत. या छाप्यांविरोधात ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात रस्त्यावर उतरून मोठा मोर्चा काढला. कोळसा घोटाळ्याचे पैसे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आले, असा आरोप करून शहा यांच्याविरोधात माझ्याकडे पेन ड्राइव्ह असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
ईडीने ‘आय-पीएसी’ या राजकीय सल्लागार संस्थेच्या कार्यालयावर छापे मारले होते. ही संस्था 2021पासून तृणमूल काँग्रेससोबत जुळली आहे. ममता बॅनर्जी यांनी छाप्यांविरोधात कोलकात्यात मोर्चा काढला. त्यांनी ईडीवर आरोप केला की, ईडीने त्यांच्या पक्षाची माहिती आणि रणनीती चोरण्याचा प्रयत्न केला. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने जनादेश चोरला. आता ही पद्धत बंगालमध्ये त्यांना वापरायची आहे. अमित शहा यांच्या विरोधात माझ्याकडे पेन ड्राइव्ह आहे. गरज भासल्यास मी जनतेसमोर तो सादर करू शकते. मी तोंड उघडले तर संपूर्ण देश हादरून जाईल. शुभेंदू अधिकारी यांनी कोळसा घोटाळ्याचा पैसा वापरला आणि अमित शहा यांना पाठवला. मी प्रतिक्रिया साधारणतः देत नाही. पण मला कोणी छेडल्यास मी सोडणार नाही, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.
दिल्लीत तृणमूल खासदारांची निदर्शने
तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी ईडीच्या छाप्यांविरोधात दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर संतप्त निदर्शने केली. त्यात महुआ मोईत्रा, कीर्ती आझाद, डेरेक ओब्रायन यांनी सहभाग घेतला. निदर्शना दरम्यान खासदारांसोबत धक्काबुक्की झाली, त्यात काही खासदार खाल पडले. खासदारांना पोलिसांनी फरफटत नेले. खासदारांना ताब्यात घेऊन दोन तासांनी सोडून दिले. ईडी तपास नव्हे तर चोरी करत असल्याचा आरोप मोईत्रा यांनी केला.






























































