
खराब हवामानामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विमान तासभर हवेतच घिरट्या घालत होते. अनेक प्रयत्नांनंतर अखेर तासाभरानंतर विमान कोलकाता विमानतळावर सुरक्षित उतरले. ममता बॅनर्जी यांची बीरभूममधील पांडवेश्वर येथे गुरुवारी दुपारी एक बैठक होती. त्यानंतर त्यांचे विमान आंदाल येथून निघाले होते. विमान दुपारी 4.10 वाजता विमानतळावर उतरणार होते.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान कोलकाता येथे उतरण्यापूर्वीच वादळी पाऊस आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे विमान लँडिंग करण्यास अडचणी येत होत्या. यामुळे विमान रानाघाट, कैखाली, सोनारपूर आणि डायमंड हार्बरच्या वरून एक तास घिरट्या घालत होते. त्यानंतर विमानाला दक्षिण 24 परगणा आणि उत्तर 24 परगणा येथे वळवण्यात आले. अखेर तासाभराने विमान कोलकाता येथे सुरक्षित उतरले. हवामान विभागाने कोलकाता आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यात आधीच सतर्कतेचा इशारा दिला होता.

























































