अल्पवयीन मुलीबरोबर विवाह करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या राहुरी पोलिसांनी मुसक्या आवळून त्याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला राहुरी न्यायालयाने 26 ऑगष्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सागर हर्क घटाला (वय 21, रा. नेपाळ. हल्ली राहणार मानोरी, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने अल्पवयीन मुलीला सुखी संसाराचे प्रलोभन देऊन तिच्याशी बालविवाह करून शारीरिक संबंध ठेवले होते. सदरच्या बालविवाह संबंधातून अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. त्यावरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुह्यातील आरोपी सागर हर्क घटाला याचा राहुरी पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. पोलीस उपनिरीक्षक खोंडे, प्रवीण खंडागळे, इफ्तिकार सय्यद यांनी आरोपीस ताब्यात घेऊन गजाआड केले. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खोंडे तपास करीत आहेत.