
घरात अवैध शस्त्रांचा साठा करणाऱ्या गुन्हेगाराला कल्याण गुन्हे शाखा युनिट ३ ने बेड्या ठोकल्या आहेत. रोशन झा (३३) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी तीन गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि घातक शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. त्याने हा साठा विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
डोंबिवली पूर्वेतील गोकुळधाम टॉवरमध्ये राहणाऱ्या तरुणाने बेकायदेशीर शस्त्रांचा साठा केल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखाप्रमुख अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून छापेमारी केली असता त्याच्या घरात पिस्तूल, काडतुसांसह दोन मॅकझीन, एक खंजीर, दोन चाकू व एक तलवार असा एकूण दोन लाख १२ हजार रुपये शस्त्रांचा साठा मिळाला. त्याच्यावर गुन्हे शाखेने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे
रोशन झा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात ९, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ३ व टिटवाळा पोलीस ठाण्यात १ असे एकूण १३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे






























































