फोनवर महिलांशी अश्लील संभाषण करणाऱ्या विकृताला अटक

767

अर्धांगवायूमुळे नीट चालणेदेखील मुश्कील झालेल असताना पवईतील एका 49 वर्षीय व्यक्तीची विकृती मात्र सुरूच होती. परिसरातील भुरटय़ा चोरांकडून चोरीचे सीमकार्ड घेऊन तो कोणालाही फोन करायचा आणि एखाद्या महिलेचा नंबर असेल तर तो तिच्याशी अत्यंत घाणेरडय़ा भाषेत बोलायचा. एका त्रस्त महिलेने याबाबत तक्रार दिल्यानंतर मुलुंडच्या नवघर पोलिसांनी त्याला दणका दिला.

सुभाष नादर असे त्या विकृताचे नाव असून तो पवईच्या चैतन्य नगरात राहतो. सुभाषला अर्धांगवायू झाला असून त्याला अंशतः दिसतदेखील नाही, पण तरी त्याच्या अंगातली मस्ती काही कमी झालेली नाही. सुभाष परिसरातील भुरटय़ा चोरांकडून चोरीचे सीमकार्ड विकत घेतो आणि कोणालाही फोन करतो. जर समोरून महिलेचा आवाज आला की तो तिच्याशी अश्लील बोलण्यास सुरुवात करायचा. अशा प्रकारे त्याची विकृती सुरूच होती. पण मुलुंड येथील एका महिलेने नवघर पोलीस ठाणे गाठून तिच्या मोबाईलवर ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबर देऊन समोरून अश्लील बोलणाऱयाची तक्रार दिली. याची पोलिसांनी तत्काळ गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दीपाली कुलकर्णी व त्यांच्या पथकाने तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पवईत राहणाऱया सुभाष नादरच्या घरात धडक दिली. सुभाषला अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला जामिनावर सोडण्यात आले.

बटणाचा मोबाईल अन् अंदाजे फोन

अर्धांगवायूबरोबर सुभाषला फारसे स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे तो कुठल्याही नंबरवर फोन करतो. समोरून महिलेचा आवाज आलाच तर तिच्याशी मग अश्लील बोलायला सुरुवात करतो. नाहीच तर तो जस्ट डायलला फोन करून मेड म्हणून महिला हवी असल्याचे सांगून नंबर मिळवतो आणि संबंधित महिलेशी अश्लील बोलतो असे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या