पत्नीवर हल्ला करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या, सातारा जिल्ह्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला करून पतीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.

अजय राजेंद्र ऊर्फ राजाराम भिसे (वय 35, रा. रविवार पेठ, वाई) व पूजा अजय भिसे (वय 25) यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता. 29 सप्टेंबरला रात्री अजय व त्याची पत्नी पूजा यांच्यामध्ये भांडण झाल्याने पूजा ही पुणे येथे निघून गेली. त्यानंतर माहेरी वाठार स्टेशन येथे वडिलांना भांडण झाल्याचे सांगितल्यावर पूजाची बहीण सुजाता घोलप व तिची आई रंजना दोरके या दोघी पूजाला वाठार स्टेशन येथे आणण्यासाठी पुणे येथे गेल्या. पुणे येथून वाठार स्टेशन येथे आल्या.

पती अजय भिसे याला आपली पत्नी वाठार येथे माहेरी आल्याचे समजल्यानंतर तो रात्री एक वाजता सासरी वाठार स्टेशन येथे आला. दरम्यानच्या काळात कौटुंबिक वादाविषयी चर्चा होत असताना, पहाटे पाचच्या सुमारास अजयने किचनमध्ये असलेली कुर्‍हाड हातात घेऊन कॉटवर झोपलेल्या पत्नीच्या तोंडावर व पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. त्यानंतर तेथून पलायन करून पहाटे सहा वाजता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्य़ा रेल्वेच्या खाली आत्महत्या केली.

पूजा हिला सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत.