दिल्ली विद्यापीठाजवळ ‘गोमांस’ विक्री; जमावाकडून संशयिताला मारहाण, पोलिसांनी घेतले ताब्यात

 

दिल्लीतील विजय नगर भागात गायीचे मांस विकल्याच्या संशयावरून एका 44 वर्षीय किराणा दुकानदारावर जमावाने हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री उशिरा दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसजवळ घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चमन कुमार असे या व्यक्तीचे नाव असून त्याचे नॉर्थ ईस्ट स्टोअर नावाचे किराणामालाचे दुकान आहे. बुधवारी रात्री 9 ते 10 च्या सुमारास चमन कुमारला गोमांस विक्री केल्याप्रकरणी मारहाण करण्यात आली. एक 15 वर्षीय मुलाला या दुकानात गाईचे मांस विकले जात असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याने लगेचच पोलिसात तक्रार दाखल केली. याबाबत परिसरातील लोकांना माहिती मिळताच जमावाने त्याच्यावर हल्ला केला.

दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये काही पुरुष “गोहत्या करणाऱ्यांना गोळ्या घाला” अशी घोषणा देत आहेत. आणि त्या दुकानदाराला मारहाण करत आहेत. हे प्रकरण सुरू असताना वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवली. यानंतर दुकानातील मांसाचे नमुने जप्त करण्यात आले आहेत हे मासं गायीचे मांस आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान या प्रकरणात सखोल चौकशी केली जात असून फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. चौकशीसाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपसणी केली जाणार आहे. तसेच यावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शिंचांही जबाब नोंदविला जाणार आहे, असे यावेळी पोलिसांनी सांगितले आहे.