
नोटा मोजून देण्याच्या नावाखाली हातचलाखी करून 16 हजार रुपये घेऊन ठगाने पळ काढल्याची घटना घडली आहे. घडल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार व्यावसायिक असून ते अंधेरी परिसरात राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांना नातीची कॉलेजची फी भरायची असल्याने ते नातीसोबत अंधेरी येथील खासगी बँकेत गेले होते. त्यांनी नातीच्या फीससाठी बँक खात्यातून 40 हजार रुपये काढले. पैसे काढल्यानंतर त्यांनी नातीला बँक पासबुकची प्रिंट काढायला पाठवले. त्याचदरम्यान एक जण त्यांच्याजवळ आला. सध्या बँकेत बनावट नोटा येत आहेत, द्या मी तुम्हाला बनावट नोटा दाखवतो असे सांगून तक्रारदाराकडून पैसे घेतले. विश्वास पटावा म्हणून त्याने एक पाचशे रुपयांची नोट काढून तक्रादाराकडे दिली. बनावट नोटा बघा असे सांगून त्याने 24 हजार रुपये तक्रारदाराच्या हातात देऊन तेथून काढला. तक्रारदार हे नोटा मोजत असताना त्यांची नात त्यांच्याजवळ आली. त्यांनी नातीला पैसे मोजायला दिले असता पैसे कमी असल्याने नातीने तक्रारदारांना सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंधेरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

























































