कावळय़ाला वाचवताना सहाव्या मजल्यावरून तरुण कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोअर परळच्या फिनिक्स मॉलमधील पॅलेडियम पी-6 पार्किंग येथे अडकलेला कावळा काढायला गेलेल्या 20 वर्षींय तरुणाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

समीर वाघरी असे मृत तरुणाचे नाव असून तो फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीत कामाला होता. फिनिक्स मॉलमधील पॅलेडियम पी-6 पार्किंग येथे कावळा अडकला असल्याचे समजताच त्या कावळ्याला काढण्यासाठी समीर सरसावला. पण कावळ्याला सोडविण्याच्या प्रयत्नात असताना समीर सहाव्या मजल्यावरून खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या समीरला तेथील कर्मचाऱ्यांनी नायर हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले.