
हायड्रोलिक पार्किंगच्या पाइपमधून अचानक मोठय़ा प्रमाणात ऑइल गळती झाल्यामुळे हायड्रोलिकवरील प्रेशर कमी होऊन पार्ंकगवर लावलेल्या कार पार्किंगसहित खाली आल्या. त्यावेळी इमारतीमधील हाऊसकीपिंगचा कर्मचारी योगेश जाधव हा त्याखाली सापडून गंभीर जखमी झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी चेंबूर येथे घडली.
चेंबूरच्या मार्ग क्रमांक 15 येथे स्वस्तिक फ्लेअर ही दहा मजली इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या हायड्रोलिक कार पार्ंकगचे दुरुस्तीचे काम सुरू असताना हायड्रोलिक पार्किंगच्या पाइपमधून अचानक मोठय़ा प्रमाणात ऑइल गळती झाली. परिणामी हायड्रोलिकवरील प्रेशर कमी झाले. त्यामुळे पार्किंगवर लावलेल्या कार पार्किंगसहित खाली आल्या. त्यावेळी स्वस्तिक फ्लेअर इमारतीमधील हाऊसकीपिंगचा कर्मचारी योगेश जाधव हा त्याखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तेथून नागरिकांनी बाहेर काढले. मात्र डॉक्टरांनी योगेशला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
























































