Satara News अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, आरोपीला 20 वर्षांची सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी वाई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली.

महाबळेश्वर तालुक्यातील आरोपी अहमद इस्माईल सरफुद्दीन याने 27 जून 2022 मध्ये एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. याबाबत पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीविरोधात पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

याबाबतचा खटला वाई न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांच्या न्यायालयात दाखल केला होता. त्यानंतर याबाबतची सुनावणी झाली. जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली काईचे पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री यांनी याकामी कामकाजात सहकार्य केले. झालेल्या अंतिम सुनावणीत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरवून आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.

याकामी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता एम. यू. शिंदे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता दयाराम पाटील यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी कीर्तिकुमार कदम यांच्यासह प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस शिपाई सपकाळ, हवालदार भुजंगराव काळे, श्रीमती कदम, शिवाजी पांब्रे, अविनाश डेरे, नाळे, कुदळे, सोमनाथ कुंभार यांनी मदत केली.